हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या

 दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात काहीच पिकले नाही आणि त्यात वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसेवाघोली येथील १८ वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

Updated: Jan 21, 2016, 01:31 PM IST
हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या title=

लातूर :  दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात काहीच पिकले नाही आणि त्यात वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसेवाघोली येथील १८ वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ऐन दुष्काळात 'हुंडा' मागणीला कंटाळून आत्महत्या केलेल्या तरुणीची हृद्य पिळवटून टाकणारी ही कहाणी.

लातूर तालुक्यातील भिसेवाघोली या गावात ऐन दुष्काळात 'हुंड्याच्या' मागणीला कंटाळून मोहिनीनं आत्महत्या केली. १२ वीचे शिक्षण घेतलेल्या मोहिनीच्या लग्नाची लगबग सुरु होती. 

लग्नासाठी स्थळं येत होती. मात्र प्रत्येकाकडून ४ ते ५ लाखांच्या हुंड्याची विचारणा केली जायची. वडील पांडुरंग भिसे हे पिग्मी एजंट. जेमतेम १ एकर शेती. त्यात दुष्काळामुळे दोन्ही हंगामात पेरून काहीच उगवले नाही. दुष्काळामुळे घरात अठरा विश्व दारिद्र्य. पण मुलीचे लग्न करायचं म्हणून भिसे कुटुंबानं शेती विकण्याचा निर्णय घेतला.. त्यांची ही चर्चा मोहिनीने ऐकली. आपल्या लग्नासाठी आई-वडिलांची ही घालमेल पाहवली नाही आणि तीनं गळफास लावून स्वताचं जीवन संपवलं..

आपल्या वडिलांची जमीन आणि पैसे आपल्या मृत्यूमुळे वाचतील, मृत्युनंतर कसल्याही धार्मिक विधीत पैसे खर्च करू नयेत तसेच हुंडा प्रथा ही बंद झाली पाहिजे अशी अपेक्षाही मोहिनीने मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केलीये.

या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान दुष्काळात एकीकडे नापिकी आणि पाण्यासाठी तडफडणा-या शेतकऱ्यांना आता आपल्या मुलींच्या लग्नासाठी 'हुंडा' प्रथेचा कसा मुकाबला करावा लागतोय याचं भयाण वास्तव उघडकीस आलंय. अशा हजारो मोहिन्यांना वाचवण्यासाठी गरज आहे ती समाजमन बदलण्याची.

मोहिनीने लिहिलेले हे पत्र

प्रिय मम्मी पप्पा..
पप्पा दारू पिऊ नका. मी कधीही असा विचार केला नव्हता की मला असे करावे लागेल. कोणतेही स्थळ आले की पहिला प्रश्न हुंडा किती देणार ? मी हे आनंदाने करत आहे. आता तुमचे पैसे लागणार नाहीत. ते मी वाचवले. पपा कोणीही हुंडा का मागतो ? ही प्रथा मोडली पाहिजे. मुलीच्या बापानेच का झुकायचे ? यासाठी मी आत्महत्या करत आहे.  मी गेल्यावर तुम्ही दिवसाचे मासिक आणि वर्षश्राध्द घालू नका. माझ्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी करतात. माझी शांती यातच आहे. तुम्ही मात्र काही करू नका. ममीला सांगा निळूला काम लावू नको. तुम्ही रडू नका. स्वत:ची काळजी घ्या… 

 
तुमची मोहिनी