अनुदान न मिळाल्याने हताश झालेल्या पतीने पत्नीचे दागिने विकून बांधले शौचालय

वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळावं यासाठी तब्बल पाच महिने महापालिकेचे उंबरठे झिजवूनही अनुदान न मिळाल्यानं धुळ्यातल्या एका नागरिकानं पत्नीचे दागिने विकून शौचालय बांधले.

Updated: Aug 26, 2016, 09:27 PM IST
अनुदान न मिळाल्याने हताश झालेल्या पतीने पत्नीचे दागिने विकून बांधले शौचालय title=

धुळे : वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळावं यासाठी तब्बल पाच महिने महापालिकेचे उंबरठे झिजवूनही अनुदान न मिळाल्यानं धुळ्यातल्या एका नागरिकानं पत्नीचे दागिने विकून शौचालय बांधले.

अजब कारभारामुळे चर्चेत राहणारी धुळे महापालिका पुन्हा एका अप्रिय घटनेसाठी चर्चेत आलीय. महापालिकेच्या 'सो कोल्ड' कार्यक्षम अधिकाऱ्यांनी गरजवंतांना शौचालयाचं अनुदान न देता भलत्याच लाभार्थ्यांना लाभ देऊन टाकलाय. महापालिकेच्या अशा कारभारामुळे मात्र नागरिक सुभाष महालेंना आपल्या पत्नीचे दागिने विकून शौचालय बांधावे लागले.  

धुळ्यात शौचालय बांधूनही अनेक लाभार्थ्यांना केवळ पहिलाच हप्ता मिळाला आहे. विशेष म्हणजे शौचालय बांधण्यापूर्वीच पालिकेने तब्बल तीन कोटी ३३ लाख रुपये अनुदान वाटप केले. त्यातील केवळ १७३५ लाभार्थ्यांनीच शौचालय बांधले. मात्र ज्यांनी इमाने इतबारे शौचालय बांधली ते अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, आयुक्त संगीता धायगुडे यांनी महालेंना शौचालय बांधकामप्रकरणी बारा हजारांचा चेक दिला. मात्र तो देताना अधिका-यांची पाठराखणही केली.  

शौचालयासाठी शेकडो कोटी अनुदान वाटले जात असताना त्यांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत होत नसल्यानं वाशीम, जळगाव आणि आता धुळ्यात आपल्या सौभाग्याचे लेणे विकून महिला शौचालय बांधत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन हे डोळे असून आंधळे आणि पाय असून लुळे असल्याचं चित्र राज्यात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.