आषाढी एकादशीला भाविक का बरं जातात पंढरीला?

आषाढी निमित्त तब्बल आज दहा लाखांहून जास्त वारकरी पंढरपूरात दाखल झालेत. पण, का बरं एवढ्या मोठ्या संख्येनं हे लोक पंढरपुरात दाखल होत असावेत? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल ना... 

Updated: Jul 15, 2016, 10:58 AM IST
आषाढी एकादशीला भाविक का बरं जातात पंढरीला? title=

पंढरपूर : आषाढी निमित्त तब्बल आज दहा लाखांहून जास्त वारकरी पंढरपूरात दाखल झालेत. पण, का बरं एवढ्या मोठ्या संख्येनं हे लोक पंढरपुरात दाखल होत असावेत? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल ना... 

मंदिराच्या कळसाचंही दर्शन सुखकारक

पंढरपुरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला पांडुरंगाचं दर्शन होतंच असं नाही. मात्र, पंढरीचा महिमा केवळ विठुरायापर्यंत मर्यादीत नाही तर  इथल्या चराचरांत विठ्ठल सामावून गेलाय... आणि म्हणूनच संतांनी सांगितल्याप्रमाणे पाच प्रकारातील एक जरी साधन प्रकार झाला तरी त्याची वारी पूर्ण झाली असं मानलं जात. या पाच साधनांमध्ये चंद्रभागा स्नान, नामदेव पायरी दर्शन, मंदिराचा कळस दर्शन, मुख दर्शन आणि पाय दर्शन यापैंकी कोणतंही एक दर्शन झालं तरी वारी पूर्ण झाली असं मानलं जातं.

चंद्रभागेचं स्नान

आनंदवारीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिराचा कळस पाहणे आणि चंद्रभागेत स्नान करणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. गेली काही वर्ष दुष्काळामुळे चंद्रभागा दुथडी भरुन वाहत नव्हती. यंदा मात्र उजनीतून चंद्रभागेत आषाडीसाठी सोडलेले पाणी दुथडी भरून वाहतंय. वारकऱ्यांना या स्वच्छ पाण्यात स्नान केल्यानं समाधान वाटतंय. चंद्रभागेत स्नान केल्याने पापांचा नाश होतो. अशा वारकऱ्यांच्या भावना असते. यंदा चंद्रभागेचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पहायला मिळत असल्याने यंदा वारकरीही समाधानी आहेत. 

बुंदीच्या लाडुंचा महाप्रसाद

पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना ओढ असते ती विठुरायाच्या भेटीची... यंदा थोडे थोडके नव्हेतर तब्बल दहा लाख भाविक पंढरपुरात दाखल झाल्याचं कळतंय. या सर्व भाविकांच्या प्रसादासाठी मंदिर समितीही सज्ज झालीय. प्रसादासाठी समितीचे तीस कामगार आहोरात्र काम करीत आहेत. दिवसाला तीस ते पस्तीत हजार बुंदिचे लाडू सध्या तयार करण्यात येत आहेत. कमी किंमतीत दिला जाणारा लाडू वारकरी मोठ्या भक्ती भावाने विकत घेतात. त्यामुळे सर्वच भाविकांना प्रसाद मिळावा याकडे मंदिर व्यवस्थापनाचा कल आहे.