विकास भोसले, झी मीडिया, सातारा : कराड नगरपालिकेत चौरंगी लढत होतेय... कराड नगरपालिका पश्चिम महाराष्ट्रातली राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी पालिका....याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
कराड नगरपालिकेसाठी 14 प्रभागातून 29 नगरसेवकांसाठी लढत होणारेय. त्यासाठी एकूण 236 अर्ज भरलेत. नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी आरक्षित असून त्यासाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल झालेत.
काही अपवाद वगळता गेली 15 वर्षे सलग राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीची सत्ता कराड नगरपालिकेत आहे. गेल्या पाच वर्षात लोकशाही आघाडी आणि उदयनराजे समर्थक राजेंद्रसिंह यादव यांत्या यशवंत विकास आघाडीची सत्ता होती. यावेळीही लोकशाही आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
तर पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीच्या माध्यमातून यशवंत जनशक्ती विकास आघाडी निवडणूक लढवतेय. याठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांनी स्वत: पुढाकार घेतलाय. त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असेल.
भाजपनंही कराडमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केलीय. भाजपनं आमदार विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कराड शहर विकास आघाडीशी हातमिळवणी केलीय.
एमआयएमनं देखील जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असून नगराध्यक्षपदासह पाच प्रभागात 10 उमेदवार रिंगणात उतरवलेत. याशिवाय बहुजन समाज पार्टीसह अन्य राजकीय पक्षाचेही समर्थक निवडणूक रिंगणात असून अपक्षांची मोठी संख्या पाहता कराडमध्ये अनेक प्रभागात चौरंगी किंवा बहुरंगी लढती होणार हे स्पष्ट झालंय.
कराडमधल्या अस्तित्वाच्या लढतीकडे सा-या राज्याचं लक्ष लागलंय. तेव्हा कराडकर कुणाला झुकतं माप देणार हे येत्या 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.