शूsss... नागपूर पोलीस झोपलेत!

नागपूरच्या सेंट्रल जेलमधून पाच अट्टल गुंड फरार झाल्यानं एकच धावपळ उडालीय. आधीच वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळं उपराजधानी त्रासलीय. आता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, कैदी फरार झाल्यानं सरकारची चांगलीच नाचक्की झालीय.

Updated: Apr 1, 2015, 10:37 AM IST
शूsss... नागपूर पोलीस झोपलेत!  title=

नागपूर : नागपूरच्या सेंट्रल जेलमधून पाच अट्टल गुंड फरार झाल्यानं एकच धावपळ उडालीय. आधीच वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळं उपराजधानी त्रासलीय. आता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, कैदी फरार झाल्यानं सरकारची चांगलीच नाचक्की झालीय.

'तहकीकात चालू आहे...' हे केवळ एकच टिपिकल पोलिसी थाटाचं उत्तर सध्या तुम्हाला नागपूर पोलिसांकडून मिळतंय. नागपूरच्या सेंट्रल जेलमधून पाच अट्टल गुंड पळून गेल्यानं पोलिसांचं नाकच कापलं गेलंय.

नागपूरचं सेंट्रल जेल म्हणजे आयएसओ प्रमाणपत्र मिळालेलं कारागृह... मात्र, इथल्या व्यवस्थापनाची ऐशी-तैशी करून पाच नामचीन गुंडांनी पोबारा केला. यापैंकी सत्येंद्र गुप्ता, मोहम्मद शोएब, बिनेश उईके हे तिघे तर मकोकाचे आरोपी... त्यांच्यावर प्रत्येकी २० ते २५ गुन्ह्यांची नोंद आहे तर प्रेम नेपाली आणि आकाश ठाकूर यांना घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात अटक झालीय. हे सगळेच नागपुरातल्या कुख्यात राजा घोस गँगचे गुंड... याप्रकरणी आता जेलचे अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आलंय.

नागपुरच्याच या कारागृहात १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील याकूब मेनन, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातला आरोपी हिमायत बेग आणि कुख्यात डॉन अरुण गवळी बंदिस्त आहेत. त्यामुळं तिथं नेहमीच खडा पहारा असतो. एवढ्या बंदोबस्तातूनही पाच पाच गुंड फरारी होतातच कसे? त्यांच्या शोधासाठी आता तीन पथकं तयार करण्यात आलीत. त्यांची तहकीकात संपेल, मग ते आरोपी कदाचित सापडतीलही... मात्र, तोपर्यंत खाकी वर्दीची जी बेअब्रू झाली, ती कशी भरून निघणार?
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.