लातूर : जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय महिलेचा पाण्यामुळे बळी गेलाय. चाकूर तालुक्यातील आटोळा या गावात भर उन्हात पाणी घेण्यासाठी रांगेत उभे असताना चक्कर येवून महिलेचा मृत्यू झाला.
केवळबाई कांबळे असे या महिलेचे नाव आहे. उन्हाची दाहकता जशी दिवसेंदिवस वाढत आहे तसे लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता वाढत आहे. आटोळा या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.
गावात ग्रामपंचायतीने अधिग्रहित केलेल्या बोअर्सचे पाणी सर्वांनाच पुरत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. गावातील बोअर्सचे पाणी घेण्यासाठी रांगेत केवळबाई उभ्या होत्या. भर उन्हात उपाशी पोटी हंडाभर पाणी आणण्यासाठी गेलेल्या केवळबाई या घरी परतल्याच नाहीत.
आटोळा गावात तीव्र पाणी टंचाई असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळेच हा पाणी बळी गेल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. केवळबाई कांबळे यांचा मृत्यू दुष्काळ आणि पाणीटंचाईची दाहकता अधोरेखित करतोय, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.