गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातली २५ गावं पाण्यात बुडवणा-या तेलंगणा सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेडीगट्टा कालेश्वर महाबंधारा प्रकल्पाचं महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी आर यांच्या हस्ते भूमीपुजन झालं. सुरक्षेच्या कारणावरून तेलंगणा पोलिसांनी गोदावरी नदीच्या दोन्ही बाजुचा ताबा घेत विरोधकांना रोखलं.
गडचिरोलीची तेलंगणा सीमा म्हणजे गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या पलीकडे तेलंगणात उत्साह असला तरी महाराष्ट्रातील शेतकरी भयभीत झालाय. या शेतक-यांचा कुणी वाली नाही. एक महिन्यांपूर्वी तेलंगणा आणि महाराष्ट्राचा करार झाला, त्यावेळी केवळ प्राथमिक करार आहे, मंजुरी नाही असा दावा राज्य सरकार आणि गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश आत्राम यांनी केला होता. आता मात्र प्रत्यक्ष बांधकामाचे भूमीपूजन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानं राज्यातली पंचवीस गावं बुडवणा-या या प्रकल्पावरुन तेलंगणा सरकारनं महाराष्ट्र सरकारची दिशाभूल केली की दोन्ही राज्याच्या जनतेनी संयुक्तपणे सिरोंचा तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल केली हा प्रश्न विचारला जातोय.
पोलीस संरक्षणात तेलंगणा सरकारनं भूमीपूजन उरकले. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि या भागातील माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांनी स्वतंत्रपणे निदर्शने करून तीव्र असंतोष व्यक्त केला.
पोलीस वगळता गडचिरोली जिल्हा प्रशासनाला या प्रकल्पाची कुठलीही माहिती नव्हती. आंतरराज्यीय प्रकल्पात तेलंगणाच्या पाण्यासाठी एवढी घाई करण्यात कुणाची अर्थपूर्ण भूमिका आहे हा प्रश्न या भागातली जनता विचारत आहे. सर्वेक्षण नाही. आराखडा नाही. शेतक-यांना कल्पना नाही. मोबदल्याची बातच नाही. पुनर्वसन तर दूरच राहिले. राज्य सरकार काय आणि का लपवू इच्छित आहे याचं उत्तर कुणाकडेही नाही.