विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून भरदिवसा तलवार घेवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. आरोपी हाफिज शेख हा भाजपचा अल्पसंख्यांक आघाडीचा शहराध्यक्ष आहे. सत्ताधारी पार्टीच्या नेत्याची ही गुंडगिरी निश्चितच धक्कादायक आहे.
चित्रपटात गुंडगिरीचं दिसणारं दृष्य औऱंगाबादेत बुधवारी भर दिवसा पहायला मिळालं. पीडित संदीप हा जिवाच्या आकांतानं पुढं पळत असल्याचं या दृष्यातं दिसतंय, तर आरोपी हाफिज आणि त्याचे साथीदार संदिपला मारण्यासाठी गजबजलेल्या त्रिमूर्ती चौकात हातात तलवार घेवून त्याचा पाठलाग करताना दिसतायत.
धक्कादायक म्हणजे आरोपी हाफिज शेख हा भाजपच्या अल्पसंख्यांक सेलचा शहराध्यक्ष आहे. हाफिजने केलेल्या हल्ल्यात संदिपच्या पाठीवर मोठी जखमही झाली आहे. संदिप पळत असताना एका दुकानात शिरला... आणि दुकानदारानं संदिपला लपवल्यामुळं त्याचा जीव वाचला.
संदीपचा बुधवारी सकाळी पार्कींगमध्ये गाडी लावण्यावरून हाफिजच्या भावासोबत किरकोळ वाद झाला होता. त्याठिकाणी मारामारीही झाली आणि तो वाद तिथं मिटलाही. मात्र, हाफिजला या गोष्टीचा राग आला आणि संदिप दिसताच हाफिज तलवार घेवून त्याला मारायला धावला. मात्र, संदिपनं प्रसंग ओळखून पळ काढला आणि त्याचा जीव वाचला.
आरोपी हाफीज हा भाजपचा पदाधिकारी आहे. त्यावर याआधीही खंडणी आणि दंगल भडकावण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. धक्कादायक म्हणजे घटना घडल्यापासून हाफीज आणि त्याचे सातही साथीदार फरार आहेत.
हाफिजवर आधीच गुन्हे दाखल असतानाही भाजपनं त्यावर अल्पसंख्याक सेलची जबाबदारी सोपवत त्याला शहराध्यक्ष पद दिले होते. मात्र, आता या गुन्ह्यानंतर हाफीजला भाजप कुठलींही मदत करणार नसल्याचं भाजप सांगतायत. त्याला तात्काळ निलंबित करण्याच उशीराच शहाणपणही आता भाजपला सुचलंय. मात्र, आरोपीला पद का दिलं याच उत्तर भाजपजवळ नाही.
आता, या प्रकरणानंतर पोलिसांनी खूनाच्या प्रयत्न आणि इतर गुन्हे दाखल केले आहे. मात्र, आरोपी अजूनही फरार आहे, त्यामुळं सत्ताधारी पार्टीच्या या नेत्याला जेरबंद करण्याचे धाडस पोलीस दाखवणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.