व्हिडिओ : जात प्रमाणपत्र मिळवायचंय... शिव्या खा!

आदिवासींची जात पडताळणी करणारा सरकारी अधिकारीच आदिवासी बांधवांना शिवीगाळ करू लागला तर? नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयात असा धक्कादायक प्रकार घडलाय. 

Updated: May 28, 2015, 10:47 PM IST
व्हिडिओ : जात प्रमाणपत्र मिळवायचंय... शिव्या खा! title=

नाशिक : आदिवासींची जात पडताळणी करणारा सरकारी अधिकारीच आदिवासी बांधवांना शिवीगाळ करू लागला तर? नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयात असा धक्कादायक प्रकार घडलाय. 

जात पडताळणी अधिकारी कसे हुकूमशाहासारखे वागतात? आदिवासी बांधवांना कशी अपमानास्पद वागणूक देतात? याचं जळजळीत वास्तवचं या निमित्तानं समोर आलंय. 

जात पडताळणी प्रमाणपत्र देणारे सह आयुक्त ई. जी. भालेराव यांच्या कार्यालयात सुरू असणारा वादविवाद, गोंधळ आणि शिवीगाळाची एक व्हिडिओ क्लिप 'झी 24 तास'च्या हाती लागलीय. जात प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या संजय धनपाल करीपुरे नावाच्या आदिवासी व्यक्तीला हे महाशय शिवीगाळ करताना दिसत आहेत. 

नाशिक जिल्ह्यातील इंदिरानगरमध्ये राहणारे करीपुरे कुटुंब आदिवासी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी झगडतंय. जातीने महादेव कोळी असलेल्या करीपुरेंना जाणीवपूर्वक जात प्रमाणपत्र दिलं जात नाहीय. परिणामी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे, पोलिसांकडे आणि कोर्टाकडे तक्रार केल्यानं भालेराव संतापलेत. अपिलात बोलावलेल्या करीपुरे कुटुंबाचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी ते त्यांनाच शिवीगाळ करताना या व्हिडिओत दिसतायत.  

दरम्यान, या प्रकाराबाबत भालेराव यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मात्र शिवीगाळ केल्याच्या आरोपाचा साफ इन्कार केला तर या शिवीगाळ प्रकरणाची शहानिशा करणार असल्याची माहिती जात पडताळणी समितीचे मुख्य आयुक्त सरकुंडे यांनी दिलीय.

आमदार गुलाबराव पाटील यांच्या तक्रारीनंतर, भालेराव यांना निलंबित करण्याची घोषणा दिलीप कांबळे यांनी विधानसभेत केली होती. मात्र, दोन महिने उलटूनही भालेरावांचं निलंबन झालेलं नाही, हे विशेष....

जात पडताळणी अधिकाऱ्यांबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत, मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाहीय, अशी आदिवासींची व्यथा आहे.  

केवळ नाशिकमध्येच नाही, तर राज्यभरात आदिवासी विद्यार्थी आणि पालकांना हा त्रास सहन करावा लागतोय. हायकोर्टानंही जात पडताळणी समितीच्या कारभारावर कठोर ताशेरे ओढलेत. आदिवासी विकासमंत्री आतातरी या तक्रारींची दखल घेऊन, आदिवासी खात्यातला हा हुकूमशाही कारभार सुधारणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.