पिंपरी-चिंचवड : पेट्रोल पंपावर ग्राहक आणि पेट्रोलपंपवाल्यांची भांडणं नवी नाहीत. विक्रेता म्हणतो पेट्रोल बरोबर भरलंय... तर ग्राहक म्हणतो कमी भरलंय... पण, आता या भांडणांना चाप बसणं शक्य होणार आहे. त्यासाठी सरसावल्या आहेत पिंपरी चिंचवडच्या दोन बहिणी... त्यांनी साकारलेल्या पेट्रोल पंपाच्या संकल्पनेचं पेटंटही त्यांनी मिळवलंय.
स्नेहा आणि अंकिता नगरकर या दोन बहिणी एक दिवस पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेल्या. तिथे ग्राहक आणि विक्रेता यांचं भांडण सुरू होतं. त्यातून त्यांना एक विचार सुचला. 'ग्राहकाभिमूख' असलेल्या या संकल्पनेमुळे पेट्रोल पंपावर तंटामुक्ती होऊ शकते. त्यासाठी पारदर्शक कंटेनर बनवण्याची ही संकल्पना आहे. या कंटेनरवर पैसे आणि पेट्रोल यांची खूण असेल. त्यामुळे ग्राहकाला पैसे आणि त्याबदल्यात मिळालेलं पेट्रोल हे अगदी स्पष्ट दिसेल.
ही संकल्पना राबवताना पेट्रोलपंप मालकांनाही फारसा खर्च येणार नाही, तसंच ग्राहकांचीही फसवणूक होणार नाही. या अगदी सोप्या वाटणाऱ्या संकल्पनेचं त्यांना पेटंट मिळालंय. अगदी छोट्या छोट्या संकल्पना मोठा परिणाम करून जातात... नगरकर भगिनींनी तेच केलंय. त्यांची ही छोटीशी संकल्पना लाख मोलाचा फायदा करून देऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.