उरी हल्ल्यातील शहिदांवर आज होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्राचे सुपूत्र संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी नाशिकमधल्या त्यांच्या खडांगळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर इतर तीन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

Updated: Sep 20, 2016, 08:54 AM IST
उरी हल्ल्यातील शहिदांवर आज होणार अंत्यसंस्कार title=

मुंबई : महाराष्ट्राचे सुपूत्र संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी नाशिकमधल्या त्यांच्या खडांगळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर इतर तीन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

शहीद चंद्रकांत गलांडे - सातारा

उरीमधील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे शहिद झाले. चंद्रकांत गलांडेंच्या निधनामुळे त्यांच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरली आहे. आपल्या गावातील लाडक्या सुपुत्राला गमवल्याची वेदना ग्रामस्थांना आणि मित्रांना आहे. तर देशासाठी आमच्या भुमीपुत्रानं आहुती दिल्याचा अभिमान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरली आहे. जाशी येथे आज सकाळी साडे दहा वाजता राहत्या घरी चंद्रकांत यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर 11 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. चंद्रकांत याच्या पश्चात पत्नी निशा, 5 वर्षांचा श्रेयश आणि 3 वर्षांचा जय ही मुलं आणि आईवडिल आहेत. चंद्रकांत १० दिवसांनी सुट्टीवर येणार होते. तसं शनिवारी त्यांनी आपल्या पत्नीला दूरध्वनीवरुन सांगितलंही होतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं.

शहीद विकास कुडमेथे - वणी, नाशिक

उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात यवतमाळच्या वणीमधील नेरड पुडचा गावचे विकास कुडमेथे शहिद झालेत. उपचारादरम्यान वीरमरण आलेल्या विकास यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ३१ वर्षीय विकास २००८ साली डोगरा रेजिमेंटमध्ये दाखल झाले. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची नियुक्ती काश्मीरला झाली होती. त्यावेळी ते आपल्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी आले होते आणि तीच त्यांची अखेरची भेट ठरली. विकास यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आठ महिन्यांची मुलगी, वृद्ध आई वडिल आणि भाऊ असा परिवार आहे. देशसेवेने भारावलेल्या विकास बारावीनंतर सैन्यात भरती झाले. गावातल्या अनेक तरुणांसाठी ते आदर्श होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी कळताच नेरड पुरड गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री संजय राठो़ड यांनी शहिदांच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय. पाकिस्तानी दहशतवादी कृत्याचा बिमोड केलाच पाहिजे, अशी मागणी नेरड पुरड ग्रामस्थांनी सरकारकडे केलीय.

शहीद विकास उईके

उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांना वीरमरण आलंय. विकास उईके अमरावती जिल्ह्यातील नांदगावचे रहिवाशी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच नांदगाववर शोककळा पसरलीय. २७ वर्षीय विकास उईके हे २००९ मध्ये भारतीय सैन्यात भर्ती झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा भारतीय सैन्यात होते. पाच-सहा दिवसांपूर्वी शहीद जवान विकास यांचे कुटुंबियांशी फोनवर बोलणं झाले होतं. महिन्याभरापूर्वीच त्यांची बदली कश्मीरमधील उरी या ठिकाणी झाली होती. विकास उईके हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच ग्रामस्थांनी त्यांच्या घरी गर्दी केलीय.

शहीद संदीप ठोक - नाशिक

महाराष्ट्राचे सुपूत्र संदीप ठोक यांच्या पार्थीवावर, नाशिकमधल्या त्यांच्या खडांगळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप ठोक यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. स्मशानभूमीत लष्कराकडून शरहीद संदीप ठोक यांना मानवंदना दिली गेली. संदीप यांचे मोठे भाऊ योगेश ठोक यांनी पार्थिवाला अग्नि दिला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. जम्मू काश्मीरमधल्या उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात संदीप ठोक शहीद झाले. दोन महिन्यांपूर्वी संदीप यांची डेहराडून इथून उरीला बदली झाली होती. उरी इथं ते कुक म्हणून कार्यरत होते.