Ashadhi Wari 2024 : महाराष्ट्राला लाभलेल्या थोर संत परंपरेसाठी जितकं कृतज्ञ रहावं तितकं कमीच. प्रपंचही तितकाच महत्त्वाचा आणि परमात्त्म्याशी एकरुप होणंही तितकंच महत्त्वाचं असं सांगत देवाच्या भक्तीसह समाजप्रबोधनाचं काम संतांनी केलं. दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांच्या आधारावर संतांनी समाजाला सन्मार्गावर नेण्यासाठी मोठा हातभार लावला. अशा या संतांच्या मेळ्यातलं अनेकांच्याच तोंडी असणारं एक नाव म्हणजे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली. पसायदान असो किंवा ज्ञानेश्वरी... माऊलींचा प्रत्येक शब्द म्हणजे प्रमाण. याच माऊलींनी इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला असं म्हटलं जातं.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई या भावंडांनी पैठण मुक्कामी असताना धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. असं म्हणतात की, धर्म, समाजानं आपल्याला स्वीकारून मुंजीची परवानगी द्यावी या हेतूनं ही मंडळी इथं आली, पण धर्मशास्त्राच्या अभ्यासामुळं त्यांनी वेगळा मार्ग निवडला होता. त्या काळात त्यांच्या एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे संस्कृतात असणारं तत्त्वंज्ञान फक्त ब्राह्मणांनाच वाचता येत होतं. ज्यामुळं सामान्यांना या ठेव्यात डोकावण्याचीही परवानगी नव्हती.
पुढं समाजाला उपदेश करणारी ही भावंड पैठणहून आळंदीच्या दिशेनं निघाली आणि त्यांचा किर्तीमान जनमानसात पसरू लागला. वाटेत लागलेल्या नेवासा या गावी त्यांचं आपुलकीनं स्वागत झालं. ही आपुलकी आणि गावकऱ्यांचं प्रेम या भावंडांना भारावून गेलं आणि या ठिकाणाला आध्यात्मिक साहित्यात ओळख असावी अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.
नेवासा येथे मुक्कामी असतानाच ज्ञानेश्वरांनी आपल्या वैचारिक ज्ञानाचा ठेवा वापरत गीता सामान्यांपर्यंत पोहोचवावी अशी इच्छा निवृत्तीनाथांनी व्यक्त केली आणि गीतेचा उपदेश सामन्यांनाही ग्रहण करता यावा यासाठी त्यांनी तो मराठीत लिहिला आणि गीतेचं हे मराठी सार भावार्थदीपिका नावानं ओळखलं जाऊ लागलं. हे शब्द मराठी साहित्यातील उपलब्ध ठेव्यापैकी सर्वात जुनं साहित्य असल्याचं सांगितलं जातं.
ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील पसायदानानंतरच्या ओवी क्रमांक 1802 आणि 1803 नुसार...
ऐसे युगी वरी कळी | आणि महाराष्ट्रमंडळी | श्री गोदावरीच्या कूळी | दक्षिणिली || 1802||
त्रिभुवनैकपवित्र | अनादी पंचकोश क्षेत्र || जेथ जगाचे जीवन सूत्र || श्री महालया असे ||1803||
म्हणजेच, अशा रितीनं कलियुगात, महाराष्ट्रदेशात गोदावरीच्या दक्षिण तटावर जिथं जगाचे जीवनसूत्र मोहिनीराज यांचं वास्तव्य आहे, असं अत्यंत पवित्र आणि अत्यंत पुरातन पंचक्रोश (नेवासे) क्षेत्र वसलं आहे.
आख्यायिकेनुसार श्री विष्णूनं इथंच मोहिनी रूप धारण केलं होतं. त्याचं प्रतीक म्हणून इथं श्री मोहिनीराज मंदिर असून ते अतिशय पवित्र क्षेत्र आहे. म्हणूनच माऊलींनी गीतेवरील सार मराठीत लिहिण्यासाठी अर्थात ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी या ठिकाणाची निवड केली असावी.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भ आणि आख्यायिकांवर आधारित असून, त्यामध्ये साधर्म्य नसू शकतं याची नोंद घ्यावी.)