विशाल करोळे, झी मीडिया औरंगाबाद : प्रदीर्घ सहवासानंतर कुणाचीही ताटातूट झाली, तर काही दिवस जीवाला चैन पडत नाही. हीच भावना प्राण्यांमध्येही आहे. मुके प्राणी ही भावना आपापल्या परीने व्यक्त करतात. औरंगाबाद पालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील दोन वाघांना शनिवारी रात्री पुण्याला हलविल्यापासून बारा वाघांनी अन्नपाणी सोडून दिले आहे.
औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयातील 12 वाघ सध्या खूप उदास आहेत, जणू शून्याकडं नजर लावून बसल्याप्रमाणं त्यांची अवस्था झाली आहे.. एकटक कसलासा विचार या वाघांच्या मनात चालू आहे.. त्याचं कारण ठरलंय यांच्या जीवाभावांच्या मित्रांचा म्हणजे सहकारी वाघांचा विरह...
औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात चार पांढरे आणि दहा पिवळे वाघ होते. काही दिवसांपूर्वी सेंट्रल झू ऑथॅरिटीच्या पथकानं नियमापेक्षा जास्त वाघ ठेवण्यावर आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेनं प्राणी संग्रहालयातील वाघांना हलवण्याचा निर्णय़ घेतला..
त्यात पुण्याच्या प्राणी संग्रहालयानं दोन वाघांची मागणी नोंदवली. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी कैफ नावाचा पांढरा वाघ आणि रिद्धी ही पिवळी वाघीण पुण्याला रवाना करण्यात आली. मात्र इकडे अन्य वाघांनी अन्नपाणीच सोडले..
एरव्ही एकमेकांसोबत दंगामस्ती करणारे, खेळणारे, बागडणारे, पिंज-याच मुक्त संचार करणारे हे वाघ आपले साथिदार गेल्यानं आता जणू शून्यात नजर लावून बसले आहेत, असे प्राणी संग्रहालयाचे प्रमुख बी. एन. नाईकवाडे यांनी सांगितले.
तर रिद्धी नावाची वाघीण पुण्याला पाठवल्यानं काही महिन्यांपूर्वी तीन जन्म दिलेले बछडेही सैरभैर झाले आहेत.. कुठं शोधू आईला असा प्रश्न या पिल्लांना पडलाय, असे केअरटेकर संजय नंदन यांनी सांगितले.
माणसांमध्ये विरहाचं दुख मोठं असतं. मात्र वाघासारखा हिंस्त्र प्राणीही विरहाच्या दुःखात वेडावून जातो, असंच म्हणावं लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.