कोल्हापुरात खंडणी प्रकरणी दोन पोलिसांसह चार जणांना अटक

खंडणी प्रकरणी शहरातील हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार संजय लोंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबुमिया काझी यांच्यासह अन्य सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

Updated: Jul 8, 2016, 08:55 PM IST
कोल्हापुरात खंडणी प्रकरणी दोन पोलिसांसह चार जणांना अटक title=

कोल्हापूर : खंडणी प्रकरणी शहरातील हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार संजय लोंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबुमिया काझी यांच्यासह अन्य सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

खाकी वर्दीवर पुन्हा एकदा खंडणीखोरीचा डाग लागला आहे. कोल्हापूरच्या हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार संजय लोंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबुमियाँ काझी या दोघा पोलिसांनी हे लाजिरवाणं कृत्य केलंय. पुण्यातील विराट इंटरप्रायझेस कंपनीच्या मालकीण आणि गिरीष गायकवाड या दोघांना त्यांनी खंडणीसाठी डांबून ठेवलं. त्यांच्याकडून ३१ लाख ५० हजार रुपयांची वसुलीही केली. हा प्रताप उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पाच कोटीच्या खंडणीसाठी दोन जणांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने ३१ लाख ५० हजार रुपये वसूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर क्राईम ब्रांचने ही कारवाई केली. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

कोल्हापूर पोलीस दलातील अशाप्रकारची ही पहिली घटना नाहीय. काही दिवसापुर्वी कळंबा कारागृहातून पुण्याच्या मारणे गँगच्या आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं. सहाय्यक फौजदार बाबुराव चौगुले आणि पोलीस कॉन्स्टेंबल मारुती पाटील अशी त्या निलंबित पोलिसांची नावं आहेत.. पोलीसच अशी खाकी वर्दीला डाग लावणारी कृत्यं करणार असतील तर दाद मागायची कुणाकडं, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.