शनीशिंगणापूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा

हायकोर्टाच्या आदेशानंतर शनिशिंगणापूरला गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना स्थानिकांच्या जबरदस्त विरोधाचा आणि नंतर पोलीस कारवाईचा सामना करावा लागला. 

Updated: Apr 2, 2016, 05:50 PM IST
शनीशिंगणापूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा title=

शनीशिंगणापूर: हायकोर्टाच्या आदेशानंतर शनिशिंगणापूरला गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना स्थानिकांच्या जबरदस्त विरोधाचा आणि नंतर पोलीस कारवाईचा सामना करावा लागला. 

त्यामुळे दुपारपासूनच नाट्यमय घडामोडी घडल्या. दुपारी देसाई नगरहून शिंगणापूरला पोहोचल्या, त्यावेळी मंदिरात ग्रामस्थ आणि भाविकांची गर्दी होती. कोणत्याही स्थितीत देसाईंना चौथऱ्यावर जाऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. 

देसाई यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मंदिर परिसरातून हुसकावून लावण्यात आलं, यावेळी त्यांना जोरदार धक्काबुक्की झाली. मात्र दर्शन घेतल्याशिवाय परत जाणार नाही, असा पवित्रा घेत देसाईंनी मंदिर परिसरातच ठिय्या दिला. 

अखेर पोलिसांनी देसाईंसह त्यांच्या 26 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. देसाई धक्काबुक्कीत किरकोळ जखमी झाल्यानं त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचं समजतं आहे. दर्शन घेऊन न देणं ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देसाई यांनी दिलाय.