नांदेड : गेल्या पाच दिवसांत झालेल्या पावसानं नांदेड जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गोदावरीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड जिल्ह्यात तब्बल 96 टक्के पावसाची नोंद झाली झाली आहे.
गेल्या 3 वर्षापासून कोरड्या दुष्काळानं होरपळलेल्या नांदेड जिल्ह्यावर यंदा वरुणराजानं भरभरुन कृपादृष्टी दाखवली आहे. गेल्या पाच दिवसांपासून नांदेडमध्ये मुसळधार पाऊस झालाय. वार्षिक सरासरीच्या 96 टक्के पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात झालीये.. या पावसानं गोदावरीला पूर आला असून विष्णुपुरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले. या पावसामुळे लोहा तालुक्यातील छोट्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे.
गेल्या पाच दिवसांच्या या पावसानं नांदेडचा सारा बॅकलॉग भरुन काढलाय.. या पावसानं गोदावी, कयाधु, मन्याड, आसना नद्या दुथडीभरुन राहू लागल्या. नद्यांचं पाणी शेतात घुसल्याने शेतीचंही नुकसान झालं. या पावसानं भूजलसाठ्यातही चांगली वाढ होईल अशी अपेक्षा आहे. मोठ्या धरणांसह इतर प्रकल्पही भरुन वाहू लागल्यानं नांदेडमधला पाणी प्रश्न पूर्णपणे मिटलाय आणि दुष्काळग्रस्त नांदेड जिल्ह्याला पावसानं हा मोठा दिलासा दिला आहे.