तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला कोण शह देणार?

जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आपली सत्ता कायम राखणार का, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच याठिकाणी सर्वेसर्वा असली तरी त्यांना मात देण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. 

Updated: Oct 19, 2016, 05:27 PM IST
तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला कोण शह देणार? title=

गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आपली सत्ता कायम राखणार का, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच याठिकाणी सर्वेसर्वा असली तरी त्यांना मात देण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. 

तिरोडा नगर परिषदेत गेल्या 12 वर्षांपासून एकहाती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. नगरपरिषदेतील पक्षीय बलाबल पाहता 17 पैकी 15 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तर भाजप आणि काँग्रेसचे एक-एक नगरसेवक आहेत. त्यामुळे याठिकाणी विरोधी पक्ष सुद्धा आहे की नाही, अशी अवस्था आहे.

गेल्या 12 वर्षात तिरोडामध्ये रस्ते, स्वच्छतेपलीकडे सत्ताधारी गेले नसल्याचा आरोप करत शहराच्या विकासासाठी परिवर्तनाची गरज असल्याचं विरोधक सांगतायत तर शहराचा विकास हाच ध्यास असल्याचं सांगत यंदाही राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष व्यक्त करत आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नाना पटोले आणि विधानसभा निवडणुकीत विजय रहांगडले यांना जनतेनं पसंती दिली. राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपनं विजय मिळवला. त्यामुळे सध्या भाजपचं मनोबल वाढल्याचं दिसतंय. यावेळी सत्ता परिवर्तन होणारच असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जातोय. 

सद्यस्थितीत पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचाच बोलबाला आहे. मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचं मनोबल वाढल्यानं ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसचा गड समजल्या जाणा-या तिरोडा नगर परिषदेवर येत्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.