शिर्डी : शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या वाढत्या गर्दीचं योग्य नियोजन करणं आणि भक्तांचा तासनतास रांगेत उभं राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी, शिर्डी साई संस्थाननं टाईम दर्शन पद्धत सुरु केली आहे. नाताळच्या सुट्टीत तिचा पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आला. मात्र ही पध्दत म्हणजे 'कही खुशी कही गम' असंच असल्याचं दिसून आलं.
शिर्डी साई संस्थानने आता सर्वसामान्य दर्शनरांग बंद केलीय. त्यामुळे साई संस्थाननं सुरु केलेल्या टाईम दर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यायचा असला तर साईभक्तांना स्वतःच नियोजन करावं लागणार आहे.
साई संस्थान एक तासाचा कालावधी ठरवून भक्तांना दर्शनाची वेळ देतंय. त्याचा फायदा होत असल्याचं काही भाविकांनी म्हटले आहे. तर कुटुंबातल्या प्रतेक सदस्याला टाईम स्लॉटच्या रांगेत उभं राहून दोन-तीन तासांच्या अंतरानं, दिलेल्या वेळी पुन्हा रांगेत उभं राहावं लागत असल्यानं काही भक्तांनी नाराजी दर्शवली आहे.
साई संस्थाने सुरु केलेल्या पद्धतीची अजून भक्ताना आणि साई संस्थान कर्मचाऱ्यांनाही पुर्ण माहिती नाही. २५ डिसेंबरचा अनुभव लक्षात घेऊन, ३१ डिसेंबरच्या महाप्रचंड गर्दीचं नियोजन साई संस्थानला करावं लागणार आहे.
टाईम दर्शन सुविधेत अजून अनेक त्रुटी आहेत. पास घेताना अंगठ्याचा ठसा आणि फोटो काढताना काहीसा वेळ जातोय. तर प्रत्यक्षात रांगेत उभं राहिल्यानंतर प्रतेक व्यक्तीचा पास तपासताना अडचणी येताहेत. काही ठिकाणी पास एकत्र गोळा करुन नंतर तपासले जात आहेत.