सिद्धटेकचा सिद्धिविनायक पाहा आकाशातून

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायक गणपतीचे आपण नेहमी जमिनीवरून दर्शन घेतले आहे. पण आता या गणपतीच्या परिसराचे मनमोहक आकाशातून दर्शन सर्व गणेश भक्तांना करून देण्याची  दोन अवलियांनी एक भन्नाट प्रयत्न केला आहे.

Updated: Sep 8, 2016, 05:51 PM IST
सिद्धटेकचा सिद्धिविनायक पाहा आकाशातून title=

सिद्धटेक :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायक गणपतीचे आपण नेहमी जमिनीवरून दर्शन घेतले आहे. पण आता या गणपतीच्या परिसराचे मनमोहक आकाशातून दर्शन सर्व गणेश भक्तांना करून देण्याची  दोन अवलियांनी एक भन्नाट प्रयत्न केला आहे.

खाली व्हिडिओ आहे..

सुशांत श्रीकांत कोयटे, श्रीकांत नारायण झंवर या युवकांच्या झॉन मीडियाने अष्टविनायकांचं आकाशातून दृश्य टिपलं आहेत,  मोरेश्वराचं मोरगाव पाहिलं तर आता सिद्धटेकचा सिद्धिविनायकाचे आकाशातून दर्शन देणार आहोत.

सुशांत श्रीकांत कोयटे आणि श्रीकांत नारायण झंवर हे दोन तरूण मूळ आयटी क्षेत्रातील असून ते अमेरिका आणि इंग्लड या ठिकाणी आयटी क्षेत्रात कार्यरत होते. पण आपल्या देशात आपल्या मातीत काही तरी नवीन करावे या उद्देशाने झपाटून झॉन मीडिया स्थापन केली. कोणत्याही कामाच सुरूवात श्रीगणेशाची वंदन करून केली जाते. त्यामुळे त्यांनी आपला पहिला प्रॉजेक्ट हा गणपतीचाच असला पाहिजे असे ठरविले.

पाहा हा जबरदस्त व्हिडिओ

त्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या ठिकाणी या दोघांची भटकंती सुरू असून यातून कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन त्यांनी ठेवला नाही. अष्टविनायकाच्या प्रोजेक्टपासून सुरूवात करायची असे सुशांत आणि श्रीकांत यांनी ठरवूले. यासाठी आवश्यक ती सामुग्री घेऊन हे तरूण निघाले अष्टविनायकाला आकाशातून टीपायला.

या अवलियांनी अष्टविनायकाचे शुटिंग पूर्ण झाले असून त्याचा पहिला व्हिडिओ त्यांनी मोरगावचा मोरेश्वर यूट्यूबवर टाकला. असे मोरगाव आपण कधीच पाहिले नव्हते. झी २४ तासने सुशांत कोयटे आणि श्रीकांत झंवर यांच्याशी संपर्क साधला. आपल्या या अभिनव प्रकल्पाबद्दल ते भरभरून बोलत होते. अमेरिकेतून परतल्यावर काही तरी वेगळं काम करण्याचं आम्ही ठरवलं त्यानुसार हा प्रोजेक्ट हातात घेतला. यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागल्या. अनेकांना विनंती करावी लागली. आमचा कमर्शिअल उद्देश नसल्याचं सांगावं लागलं. मग आम्हांला शुटिंगला परवानगी मिळाली.

या सर्व कार्यात मंदिराच्या ट्रस्टींनी खूप मदत केली. त्यांनी आम्हांला शुटिंगला खूप मदत केली. आकाशातून शुटिंग करताना खूप मजा आली. परदेशात असताना खूप रिसर्च केला होता. यात होल अँड सोल आम्ही आहोत. शुटिंग, एडिटिंग, ग्राफिक्स आणि म्युझिक कम्पोज या सर्व गोष्टी आम्हीच केल्याचे श्रीकांत झंवर यांनी सांगितले.

मूळचे कोपरगावचे असलेले सुशांत कोयटे यांनी अमेरिका पाहिली होती पण कोकणात जाण्याचा त्यांचा कधी योग आला नव्हता. पण अष्टविनायकातील काही गणपती कोकणात असल्याने पहिल्यांदा निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण पाहिला आणि कोकणाच्या प्रेमातच पडलो. आम्ही शुटिंग केली त्यावेळी पावसाळा सुरू होता. त्यामुळे शुटिंग करण्यात आणखी मजा आली. आपला देशात असं वातावरण असतं हे कधी विचारही केला नव्हता, असे कोयटे यांनी सांगितले.

पाहा मोरगावचा मोरेश्वर आकाशातून

सिद्धटेकाचे स्थान माहत्म

सिध्दटेक स्थितो भीमातीरे जगदवनकामेन हरिणा !

विजेतु दैत्यो तच्छुति मलभवौ कैटभमधू !!

महाविघ्नार्तेन प्रखर तपसा सेवितपदो !

गणेश सिद्धीशो गिरवरवपू: पंचजनक !!

 

सिद्धटेकचे महत्त्व

सिध्दटेक...अष्टविनायकातील एक प्रसिद्ध स्थान...विष्णूंच्या तपश्चर्येनं आणि सिद्धीविनायकाच्या वास्तव्यानं पवित्र झालेली भूमी...मोरया गोसावी, नारायण महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं सिध्दटेक...सृष्टी जणू चारही हातांनी निसर्गसौंदर्याची उधळण करतेय असं हिरवाईनं नटलेलं सिध्दटेक...अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या किनारी हे गाव वसलंय...

 

कोणी बांधला सिद्धिविनायकाचा गाभारा...

पेशव्यांपासून अनेक राजे, सरदारांची श्रद्धा असणा-या सिध्दीविनायकाचं मंदिर उत्तराभिमूख आहे...मंदिराचा गाभारा सुमारे 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद आहे...पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हा गाभारा बांधलाय...श्री सिद्धीविनायकाच्या भोवतीचं मखर पितळेचं असून उजव्या-डाव्या बाजूंना जय-विजयाच्या मोठ्या मूर्ती आहेत...बाप्पाचं सिंहासन दगडी आहे...या गाभा-यात देवाचं शेजघर आहे... त्याचठिकाणी बाजूला शिवपंचायतन आहे... मंदिराच्या दर्शनरांगेजवळची दीपमाळ, बुरुज देखील अहिल्याबाई होळकरांनी बांधलेत... पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांना खर्ड्याच्या लढाईत श्रींच्या कृपेनं यश आलं...त्यामुळे त्यांनी त्याठिकाणच्या पाषाणांनी मंदिरातलं काही बांधकाम केलं तसंच भीमा नदीवर घाटही बांधल्याचं सांगितलं जातं...      

 

सिद्धिविनायक मूर्तीचे वैशिष्ट्ये

मंदिरातून आत गाभा-यात प्रवेश करताच श्री सिध्दीविनायकाची मूर्ती नजरेचा ठाव घेते...सिध्दीविनायकाची मूर्ती 3 फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे... मूर्तीचं मुख उत्तरेकडे असून ती गजमुख आहे... सोंड उजवीकडे झुकलेली आहे...मूर्तीचं पोट मात्र मोठं नाही... सिध्दीविनायकानं एक मांडी घातलेली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत...अष्टविनायकांपैकी या एकाच गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे... त्यामुळे हे दैवत अत्यंत कडक मानलं जातं... मूर्तीची पूजा अर्चा कडक सोवळ्यात केली जाते. सकाळ, दुपार, संध्याकाळ गणेशाची षोडोपचार पूजा करुन नैवेद्य दाखविला जातो... सिध्दीविनायकाची मूर्ती टेकडीच्या मध्यभागी असल्यानं मंदिर टेकडीच्या तीन बाजूंनी बांधण्यात आलंय. त्यामुळे या मंदिराची प्रदक्षिणा एक किलोमीटर इतकी असून श्रींच्या दर्शनाप्रमाणंच या प्रदक्षिणेलाही विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं...

 

कसा आहे मंदिराचा परिसर...

मंदिराच्या बाहेरच्या बाजूस सभामंडप आहे...पुढे महाद्वार आणि त्यावर नगारखाना...याठिकाणी त्रिकाळ चौघडा वाजतो... बाहेर मारुतीचं मंदिर आहे...श्रींच्या मंदिरापासून पश्चिमेस श्री शिवाई देवीचं आणि श्री शंकराचं छोटंसं मंदिर आहे...या मंदिराच्या जवळूनच भीमा नदी दक्षिणाभिमुख वाहते... असं म्हणतात की, या नदीला कितीही मोठा पूर आला तरी इथं तिचा आवाज होत नाही...जवळच श्री काळभैरवाचंही देवस्थान आहे...

 

सिद्धटेक कसं नाव पडलं...

या नगरीला सिध्दटेक नाव कसं पडलं याची एक आख्यायिका सांगितली जाते... ब्रम्हदेवाला त्याच्या सृष्टीरचनेच्या कार्यात मधू आणि कैटभ या दोन अतिशय पराक्रमी दैत्यांनी विघ्न आणून त्रास देण्यास सुरुवात केली होती. तेव्हा ब्रम्हदेव विष्णूकडे गेले... विष्णूंनी या दैत्यांशी बराच काळ युद्ध केलं मात्र त्या दैत्यांचा पराभव झाला नाही... त्यावेळी विष्णू सहाय्याची याचना करण्यासाठी शंकराकडे गेले... त्यांना प्रसन्न करुन घेतलं... त्यावेळी शंकरांनी विनायकाला प्रसन्न करुन घेण्यासाठी श्री गणेशाय नम: या षडाक्षर मंत्राचा जप उपदेशिला... या मंत्राच्या अनुष्ठानासाठी पवित्र क्षेत्र शोधत श्री विष्णू एका टेकडीवर गेले... त्याठिकाणी मंत्रजपानं त्यांनी विनायकाला प्रसन्न करुन घेतलं... आणि दैत्यांचा नाश केला... विनायकानं इच्छित वर दिल्यानंतर विष्णूंनी या टेकडीवर देवालय उभारलं आणि त्यात श्री गजाननाची मूर्ती स्थापली... विष्णूंना इथं सिध्दी मिळाली म्हणून या क्षेत्राला सिध्दक्षेत्र किंवा सिध्दटेक आणि विनायकाला सिध्दीविनायक नाव पडल्याचं सांगितलं जातं...

कधी असतो मोठा उत्सव...

भाद्रपद चतुर्थी आणि माघ चतुर्थीला मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो...मोठ्या थाटात गणेशाची पालखी घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते...यावेळी भाविक गणेशाची पदं गातात...दोन्ही उत्सवांबरोबरच दररोज दर्शनासाठी मोठी गर्दी असते. श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनानं मनातल्या सर्व चिंता, क्लेश दूर होऊन प्रसन्नता लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. इथला शांततापूर्ण परिसर आणि भक्तिमय वातावरणामुळे येणा-या भक्तांना आत्मिक समाधान लाभतं...

 

सिद्धटेक गाव कसं आहे....

सिध्दीविनायकाच्या टेकडीला लागून पसरलेलं अवघ्या काहीशे उंब-यांचं गाव... मंदिराच्या महाद्वारावरून एक नजर टाकल्यास गावाचं असं विहंगम दृष्य दृष्टीस पडतं...इथलं सिध्दीविनायक देवस्थान म्हणजे गावाचा जणू आत्माच...

मंदिर परिसराला नेहमीच जत्रेचं स्वरूप आलेलं दिसतं... दिवसाकाठी शेकडो गणेशभक्त सिध्दीविनायकाच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या येण्यानं गावक-यांच्या उदरनिर्वाहाचीही चिंता काही प्रमाणात मिटते... मंदिर परिसरातली देवपूजेच्या साधनांची ही दुकानं इथल्या गावक-यांच्या उपजीविकेचं साधन आहे...

 

कोणते व्यवसाय चालतात या ठिकाणी....

भीमा नदीच्या पाण्यावर वाढणारी शेती, त्याठिकाणी होणारी मासेमारी हेही एक इथल्या गावक-यांच्या उपजीविकेचं एक साधन...मात्र कमी पावसाचा प्रदेश असल्यानं मासेमारीचा व्यवसायही नदीला पाणी असेपर्यंतच चालतो.

 

पुलाने बोटीचा व्यवसाय बंद पडला

पुणे आणि नगर जिल्ह्याच्या अगदी सीमेवर असणा-या सिध्दटेकला पोहोचण्यासाठी आधी भीमा नदी पार करत बोटीनं जावं लागायचं... मात्र 2006 नंतर नदीवर पूल झाल्यानं हा प्रवास सुखकर झालाय... मात्र त्यामुळे नावाड्यांच्या बोटी आता पडून आहेत...

भाविकांसाठी इथल्या स्थानिकांनी घरगुती खानावळी सुरू केल्यायत...हेही गावक-यांच्या उपजीविकेचं एक साधन...स्वादिष्ठ जेवणामुळे दर्शनानंतर भाविक इथंच जेवायला पसंती देतात...

असा हा श्री सिध्दीविनायक आणि त्याचं सिध्दटेक गाव... गाव छोटंसच असलं तरी इथलं वातावरण तुम्हाला पुन्हा याठिकाणी यायला भाग पाडतं..