ठाणे : वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरात असलेल्या शासकीय तंत्र निकेतन अर्थात आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी तोडफोड केली.
विद्यार्थ्यांना पेपर पुर्नतपासणीचे दिलेले आश्वासन न पाळल्याने या विद्यार्थ्यांनी कार्यालयात घुसून तोडफोड केली. या आयटीआयमध्ये तब्बल ५०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. हे सर्व विद्यार्थी अन्य परीक्षेत उतीर्ण झाले.
मात्र नुकत्याच घेण्यात आलेल्या सहामाहीच्या परीक्षेत ५०० विद्यार्थ्यापैकी केवळ २५ विद्यार्थी पास झाले. तर उर्वरित सर्व विद्यार्थी हे एकाच विषयात नापास झाले. प्राचार्यांनी मुलांच्या तक्रारीची आणि आंदोलनाची दाखल घेत पेपर पुर्नतपासणी करण्याची तयारी दर्शविली होती.
मात्र या घटनेला १० दिवस उलटूनही दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यानी तोडफोड केली. या प्रकरणी अज्ञात विद्यार्थ्यांवर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.