पोलीस स्टेशनजवळच 'तडीपार' गुंडाकडून तरुणीचा विनयभंग

नागपुरातील कायदा आणी व्यवस्था योग्य असल्याचे दावे होत असतानाच, एका तडीपार गुंडाने एका महिलेला मारहाण केल्याची खळबळजनक आणि तितकीच संताप आणणारी घटना नागपुरात घडली आहे. 

Updated: Mar 31, 2015, 11:00 AM IST
पोलीस स्टेशनजवळच 'तडीपार' गुंडाकडून तरुणीचा विनयभंग title=

नागपूर : नागपुरातील कायदा आणी व्यवस्था योग्य असल्याचे दावे होत असतानाच, एका तडीपार गुंडाने एका महिलेला मारहाण केल्याची खळबळजनक आणि तितकीच संताप आणणारी घटना नागपुरात घडली आहे. 

नागपुरात कायदा सुव्यवस्था नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ पुन्हा एकदा आलीय. एका सराईत आणि तडीपार गुंडानं  १८ वर्षांच्या मुलीला विवस्त्र करुन जबर मारहाण केलीय. या नराधमाचं नाव प्रकाश बागडे... २६ मार्चच्या रात्री प्रकाश बागडेनं त्या मुलीला त्याच्या घराजवळ बोलावलं. 

माझ्या प्रेयसीची माहिती मला का देत नाही? म्हणून तिला विवस्त्र करून काठीने जबर मारहाण केली. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे,  पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर धक्कादायक प्रकार घडला.  

ती मुलगी कशीबशी प्रकाश बागडेच्या तावडीतून सुटली आणि रात्री ११ वाजता आपल्या मैत्रिणीबरोबर इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. पोलिसांनी लगेच तिची वैद्यकीय तपासणी केली. 

पण, पोलिसांच्या लेखी तडीपार असलेल्या गुंडाकडून मारहाण झाल्याचं कळताच आपल्यावरचा ताण टाळण्यासाठी पोलिसांनी या मुलीला रात्री तीन वाजता परत पाठवलं. पोलीस मदत करत नाहीत आणि वस्तीत परतल्यावर प्रकाश बागडेची भीती त्यामुळे दोघींनी मंदिरात बसून रात्र घालवली. शेवटी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं तिनं पुन्हा पोलीस स्टेशन गाठलं.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मध्यस्थी नंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पण एक तडीपार गुंड पोलीस ठाण्यावरून हाकेच्या अंतरावर मुलीवर अत्याचार करतोच कसा? याचं उत्तर पोलिसांकडे नव्हतं. यानंतर, सगळं काही पोलिसांच्या आशीर्वादानंच होतंय का? असाही प्रश्न समोर आलाय. 

या घटनेनंतर आणखी काही महत्त्वाचे प्रश्न समोर आलेत... 

  • तडीपार गुंड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर राहात असताना, पोलिसांना माहीत कसं नाही?

  • पोलिसांच्या आशीर्वादानंच हे सगळं घडत होतं का?

  • पोलिसांची भूमिका इतकी संशयास्पद असताना, पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा?

  • मुलगी अत्याचाराची तक्रार करायला आलेली असताना, पोलीस तिला घरी कसं पाठवतात?

प्रकाश बागडेला गुंडगिरीचा मोठा इतिहास आहे. हा रामबाग आणि इमामवाडा परिसरात दारूचा तस्कर म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर याआधी धमकावणे, मारहाण करणे, खंडणीसाठी धमकावणे, बलात्कार करणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे  आहेत. म्हणूनच त्याला शहरातून तडीपार करण्यात आलं. मात्र, स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने प्रकाश बागडे कधी तिथून गेलाच नाही. स्वतःच्याच वस्तीत राहून तो अवैध दारूचा धंदा करायचा आणि मुलींना त्रास द्यायचा. आणखी महत्त्वाचं म्हणजे तडीपार असलेला बागडे पोलिस स्टेशनच्यामागे अवघ्या २०० मीटर अंतरावर त्याच्या घरीच सापडला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.