सांगली: पुण्यापाठोपाठा सांगली जिल्ह्यातही ऊस दर आंदोलनाचं लोण पसरलं. सांगली जिल्ह्यातील नांद्रे इथं दोन बसेस फोडण्यात आल्या. तर सांगली-इस्लामपूर रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळं काही काळासाठी या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली.
दोन बसेस फोडल्यामुळं सांगली-वसगडे मार्गावरची एस. टी. सेवा बंद करण्यात आली आहे. तसंच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
दरम्यान आमचं आंदोलन शांततपूर्ण असल्याचं आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. तर, ज्या युती सरकारने राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती, त्याच सरकारनं सहकारी नेत्यांना तुरुंगात टाकल्याची जळजळित प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी आपण जामीन घेणार नसल्याचं सांगत तुरुंगात राहणार असल्याचे व आंदोलन करणार असल्याचं सांगितलं.
पवारांचा शेट्टींना टोला
स्वाभिमानीच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामानं उभं राहिलेलं साखर संकुल फोडण्याचा अधिकार नसल्याचा टोला पवारांनी खासदार राजू शेट्टी यांना हाणलाय.
सहकारमंत्र्यांचा कारखानदारांना इशारा
उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी पुढच्या तीन दिवसांत साखर कारखानदारांना नोटीस बजावल्या जाणार आहेत. सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्य़ास कारखान्यांच्या गोदामांना सील करण्यात येईल, असा इशारा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.
आरोप-प्रत्यारोप
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन ऊस दरवाढीसाठी नसून मंत्रिपदासाठी असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी या आरोपांचा इन्कार केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.