एसटी सेवा सुरु करा अन्यथा वसई-विरार पालिका बरखास्त करु, उच्च न्यायालयाने फटकारले

वसई-विरार भागातील एसटी फेऱ्या सुरु करा अन्यथा पालिका बरखास्त करण्यात येईल. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासक बसवू, अशा कडक शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला फटकारले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 31, 2017, 05:45 PM IST
एसटी सेवा सुरु करा अन्यथा वसई-विरार पालिका बरखास्त करु, उच्च न्यायालयाने फटकारले title=

वसई : वसई-विरार भागातील एसटी फेऱ्या सुरु करा अन्यथा पालिका बरखास्त करण्यात येईल. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासक बसवू, अशा कडक शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला फटकारले.

एसटी सेवा सुरु करण्याचा मुद्दा वसई विरार महापालिकेकडून सुटत नसल्याने राज्य सरकारने यात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर वसई विरार भागात रुट नंबर २१ वर एसटी बस सेवा एसटी सेवा सुरु करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाला देखील खडसावले असून तुम्हाला जर महामंडळ चालवता येत नसेल तर तसं सांगा, आम्ही तिथं संचालक नेमतो. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे आणखी हाल करू नका, असे खडेबोल न्यायालयाने एसटी महामंडळाला सुनावलेत. 

सेवा तोट्यात असल्यामुळे एसटी महामंडळानं ३१ मार्चपासून वसई विरार येथील काही फेऱ्या बंद करणार असल्याचं जाहीर केले होते. महामंडळाच्या या निर्णया विरोधात वसईतील १२ वर्षीय शाळकरी मुलाने त्याच्या शिक्षकांसोबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता या याचिकेवर पुढील १५ दिवसांनी पुन्हा सुनावणी होणार आहे.