कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला, रेल्वेच्या ६० जादा गाड्या

 गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या ६० विशेष गाड्या सोडणार आहेत. 

Updated: Jul 12, 2015, 12:40 PM IST
कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला, रेल्वेच्या ६० जादा गाड्या title=

मुंबई :  गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या ६० विशेष गाड्या सोडणार आहेत.  यासाठी उद्यापासून आरक्षण सुरु होणार आहे, हे आर्क्षण रेल्वेच्या प्रवासी आरक्षण केंद्राबरोबरच ऑनलाईनही उपलब्ध असेल. या सर्व गाड्या १० सप्टेंबरपासून कोकणाच्या दिशेनं रवाना होतील. मुंबई-मडगाव-मुंबई, दादर-सावंतवाडी या गाड्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरु होईल. 

कोकणातील बहुसंख्य जनता ही मुंबई आणि महानगरात राहते. ही जनता गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मोठ्या संख्येनं कोकणात जाते. त्यामुळे गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून ६० विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करुन याबाबतची माहिती दिली.

 01001/01002 सीएसटी-मडगाव-सीएसटी ट्रेन गुरुवार वगळता ११ ते २९ सप्टेंबरपर्यंत आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. सीएसटीहून रात्री १२ वाजता निघणारी ट्रेन मडगावला त्याच दिवशी दुपारी २.१० मिनिटांनी पोहोचेल. तर मडगाववरुन दुपारी २.४० मिनिटांनी सुटणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता सीएसटीला पोहोचेल.

 तर 01033/01034 सीएसटी-मडगाव-सीएसटी ही ट्रेन १० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान दर गुरुवारी सोडण्यात येईल. ही ट्रेन दर गुरुवारी रात्री १२.२० मिनिटांनी सीएसटीहून सुटेल आणि दुपारी २.१० मिनिटांनी मडगावला पोहोचेल. तर मडगावहून दर गुरुवारी ३.२५ मिनिटांनी सुटणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ ला सीएसटीला पोहोचेल.

तसंच 01095/01096 दादर - सावंतवाडी - दादर ही ट्रेन ११ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरदरम्यान आठवड्यातील रविवार, मंगळवार आणि शुक्रवार हे तीन दिवस धावणार आहे. 01095 ही विशेष ट्रेन दादरहून सकाळी ७.५० ला सुटेल आणि सावंतवाडीला रात्री ८.३० मिनिटांनी पोहोचेल. तर 01096 ही ट्रेन सावंतवाडीहून सोमवार, बुधवार आणि शनिवारी पहाटे ४.५० मिनिटांनी सुटेल आणि दादरला दुपारी ३.५० मिनिटांनी पोहोचेल.

 १० सप्टेंबरला धावणाऱ्या 01033/01034 या ट्रेनचं आरक्षण १२ जुलैपासून सुरु होईल. ११ सप्टेंबरला सुटणाऱ्या 01001/01002, 01095  या विशेष ट्रेनचं आरक्षण १३ जुलैपासून सुरु होणार आहे.  तर १२ सप्टेंबरला सुटणाऱ्या 01096 ट्रेनचं आरक्षण १४ जुलैपासून सुरु होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.