मुख्यमंत्र्यांचे विदर्भाकडे विशेष लक्ष, घोषणांचा पाऊसच

कायम पिछाडीवर राहिलेल्या विदर्भाला विकासाच्या गंगेत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगीरथ प्रयत्न सुरू केलेत. विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी आज विविध घोषणांचा पाऊसच पाडला.

Updated: Dec 19, 2014, 10:13 PM IST
मुख्यमंत्र्यांचे विदर्भाकडे विशेष लक्ष, घोषणांचा पाऊसच title=

नागपूर : कायम पिछाडीवर राहिलेल्या विदर्भाला विकासाच्या गंगेत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगीरथ प्रयत्न सुरू केलेत. विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी आज विविध घोषणांचा पाऊसच पाडला.

देवेंद्र फडणवीसांच्या राजवटीत विदर्भावरील अन्याय दूर होईल का?
> विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढणार
> शेती विकासासाठी दरवर्षी 500 कोटी रू. देणार
> विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन करणार
> महसूली मुख्यालयांच्या ठिकाणी विमानतळे उभारणार
> विदर्भातील शहरांच्या विकास आराखड्यांना मान्यता
> लोणारला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार

विकासापासून कोसो दूर असलेल्या विदर्भावर शुक्रवारी चक्क देवेंद्राची कृपा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ विकासासाठी विविध घोषणांचा सपाटाच विधानसभेत लावला. विदर्भाच्या मागासलेपणाबाबत चिंता व्यक्त करणारा प्रस्ताव विरोधकांनी विधानसभेत मांडला, त्यावर दोन दिवस झालेल्या व्यापक चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही आश्वासने दिली.

राज्यकर्त्यांकडून सातत्याने विदर्भाला सापत्न वागणूक देण्यात आली. राज्यपालांनी निर्देश देऊनही विदर्भाच्या वाट्याला तब्बल ६ हजार कोटी रूपये कमी देण्यात आले. राज्यकर्त्यांच्या या अन्यायामुळं वेगळ्या विदर्भाची भावना वाढीस लागतेय, याकडे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं.

विदर्भातील ११ लाख हेक्टर सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी यापुढं धडक कार्यक्रम राबवण्यात येईल. विदर्भातील १०२ सिंचन प्रकल्पांचे काम २०१५पर्यंत पूर्ण करण्यात येईल. गोसीखुर्द प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण सिंचन क्षमतेसह पूर्ण करण्यात येईल. त्याशिवाय विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन करणार, विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक फळे-भाजीपाला केंद्र सुरू करणार, विदर्भात उद्योगांना वीज सवलत देणार, अमरावतीत टेक्सटाईल हब उभारणार, विदर्भात ९ टेक्सटाईल उद्योग सुरू करणार असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

शहर विकास आराखड्यांना मान्यता
विदर्भातील सर्व शहरांच्या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली असून, राज्यात गेल्या १० वर्षात जेवढ्या विकास आराखड्यांना मंजूरी नाही, तेवढी आम्ही एका दिवसात दिली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नागपूर गोरेवाडा प्राणीसंग्रहालय लवकर सुरू करणार, विदर्भात रस्ते विकासाचा कार्यक्रम राबवणार, विदर्भ विकासकामांच्या निर्णयासाठी दोन दिवस राखीव ठेवणार, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली..

देवेंद्र फडणवीस हे देखील विदर्भातलेच असल्याने विदर्भवासियांची कळकळ ओळखून त्यांनी हे विकासाचं मॉडेल विधानसभेत मांडलं. उपराजधानी नागपूरात सुरू असलेल्या अधिवेशनातून हा अमृतकलश आता विदर्भाच्या वाट्याला आलाय.

फडणवीसांच्या या दूरदृष्टीला दाद द्यायला हवी. याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाकडे लक्ष दिलं असतं तर वेगळ्या विदर्भाची भाषाच सुरू झाली नसती. मुख्यमंत्र्यांनी आता बोले तैसा चाले... ही उक्ती आपल्या कृतीतून खरी करून दाखवावी आणि विदर्भ विकास करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.