महाड : महाड दुर्घटनेतील 6 मृतदेह आतापर्यंत सापडले असून तिघांची ओळख पटली आहे. आज सकाळीच आंजर्ले समुद्रकिनारी देवगड मुंबई बसचा चालक श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर हरिहरेश्वरमध्ये 1, केंबुर्लीत 2 आणि दादली इथे 2 मृतदेह सापडेलत..
महाडजवळील केंबुर्ली येथे प्रत्येकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून त्यांची ओळख पटली आहे. या दोघीही एकमेकांच्या नातेवाईक आहेत. केंबुर्ली येथील सापडलेला मृतदेह हा रंजना संतोष वाजे यांचा असून त्या रत्नागिरी जिल्हयातील सापु गुहागर येथील रहिवासी आहेत. त्या त्यांच्या आजारी वडिलांना भेटायला चालल्या होत्या. पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला.... आणि आज त्यांच्या आजारी वडिलांचंही निधन झालं.
तर हरिहरेश्वर येथील मृतदेह शेवंती मिरगल यांचा असून त्या मृत रंजना यांच्या काकी आहेत. या दोघी तवेरा गाडीतून प्रवास करीत होत्या . त्यामध्ये एकूण 7 प्रवासी होते.
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दादली पुलाजवळ पुरूषाचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान जखमींना उपचार मिळावेत तसेच मृतदेह सुरक्षित जतन करून ठेवता यावेत यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केली आहे.
महाड येथील ग्रामीण रूग्णालयात 4 डॉक्टरांचे पथक तयार आहे. 30 हून अधिक मृतदेह ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. खाडीकिनारी ठिकठिकाणी रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत.