नाशिक : शिवसेनेच्या मंत्र्यांनी महिनाभरापूर्वी नाशिकमधील दुष्काळी भागाची पाहणी केली होती. पण हा दौरा फार्स होता की काय, अशी शंका येऊ लागलीय.
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंनी महिनाभरापूर्वी दिलेलं हे आश्वासन. गेल्या १९ डिसेंबरला त्यांनी इगतपुरीच्या वाघेरे गावी कृष्णा शिंदे नावाच्या शेतक-याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी हा शब्द दिला. मात्र कृष्णाचं कुटुंब मदतीपासून वंचित राहिलंय.
जिल्हा प्रशासनाच्या मते कृष्णाच्या स्वत:च्या नावावर जमीन नव्हती. त्यानं अवघ्या दोन महिन्यापूर्वी आयसीआयसीआय बँकेचे २ लाख ५९ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जासाठी बँकेने कुठल्याही प्रकारचा तगादा लावला नव्हता. त्यामुळं आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसांना दिल्या जाणा-या मदतीसाठी या कुटुंबाला अपात्र ठरवण्यात आलंय.
कृष्णा शिंदेंचं कुटुंब मदतीसाठी पात्र नसल्याचं प्रशासनानं त्याचवेळी निदर्शनास का आणून दिलं नाही? आणि अधिका-यांनी ते निदर्शनास आणलं असेल तर एकनाथ शिंदेंनी कोणत्या आधारावर आश्वासन दिलं, असा सवाल आता केला जातोय.
नाशिक जिल्ह्यात २०१५ मध्ये तब्बल ८५ शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. त्यापैकी ५३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयाची मदत करण्यात आलीय. त्यात ७० हजार रुपयाचे एफडी आणि ३० हजार रुपये रोख रक्कम देण्यात आलेत. तर २८ जणांना अपात्र घोषित करण्यात आलं असून ४ जणांचे प्रस्ताव फेर चौकशीसाठी पाठविण्यात आलेत.