वसई : वसई विरार नगरपालिका निवडणुकीसाठी अखेर शिवसेना भाजपची युती झाली आहे. या युतीची औपचारिक घोषणा बुधवारी ठाण्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. युतीच्या जागावाटपानुसार शिवसेना ७५ जागांवर तर भाजपा ४० जागांवर निवडणूक लढविणार आहेत.
वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांपैकी शिवसेना ७५, तर भाजप ४० जागा लढविणार असल्याचे शिवसेना उपनेते अनंत तरे आणि भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी जाहीर केले. भाजपने ५२ जागांचा आग्रह धरला होता. शिवसेनेने एवढ्या जागा देण्यास नकार दिला होता. पण कोणत्याही परिस्थितीत युती झाली पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना केल्या होत्या.
गेले दोन दिवस चार-पाच जागांवरून ताणाताणी सुरू होती. शेवटी पर्यावरणमंत्री रामदास कदम, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, अनंत तरे, कपिल पाटील या नेत्यांमध्ये दिवसभर झालेल्या चर्चेतून युती आकारास आली. त्यामुळे युती वसई-विरार पालिकेवर भगवा फडकवणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, सेना उपनेते विवेक पंडीत यांच्या वसई विकास आघाडीशी सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बोलणी सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. मुंबईला लागून असलेलं आहे वसई विरार शहर. स्वस्त आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारी घरं वसई विरार परिसरात मिळू लागली. त्यामुळं झपाट्यानं या शहराची लोकसंख्या बघता बघता २० लाखांच्या घरात पोहचली. त्यामुळं शहरात पाणीटंचाई जाणवू लागली. त्यामुळं भविष्याचा विचार करुन दूरदृष्टीने वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नवीन पाणी योजना आखली.
पाटबंधारे खात्याकडून सूर्या धरणातून पाणी उपलब्ध होण्याची परवानगी त्यांनी मिळवली. २०१३ मध्ये हे पाणी वसई विरारला मिळालं. हितेंद्र ठाकूर यांच्यासह आमदार क्षितीज ठाकूर, विलास तरे आणि तत्कालीन खासदार बळीराम जाधव यांनी या योजनेसाठी २०१४मध्ये निधी मिळवला. या योजनेच्या माध्यमातून १०० ते १२० एमएलडी पाणी सूर्या धरणातून वसई विरारकरांसाठी उपलब्ध होणार आहे. पाण्याचे राजकारण वसई-विरारमध्ये कोणाला तारणार याचीच चर्चा सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.