राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेससह भाजप, सेनेची तयारी

सातार जिल्ह्यातील ८ नगरपालिका व ६ नगर पंचायतींसाठी निवडणूक होणार असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेने तयारी सुरु केली आहे.  

Updated: Oct 18, 2016, 04:12 PM IST
राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेससह भाजप, सेनेची तयारी title=

सातारा : जिल्ह्यातील ८ नगरपालिका व ६ नगर पंचायतींसाठी निवडणूक होणार असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे कराड नगरपालिकेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.  (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)

सातारा जिल्ह्यातल्या सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, फलटण, रहिमतपूर या आठ नगरपालिका आणि खंडाळा, कोरेगाव, दहिवडी, वडूज, पाटण आणि मेढा या 6 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबरला निवडणुका होतायत... एकूण आठ नगरपालिकांपैकी सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण आणि रहिमतपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तर म्हसवड आणि पाचगणी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे.

मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला शह देण्यासाठी भाजप-शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कराड नगरपालिकेत राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर मात करण्याचं आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसमोर असणारे आहे. भाजपचे अतुल भोसले आणि माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचंही मोठे आव्हान पृथ्वीराज चव्हाणांसमोर असणार आहे.

साता-यात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून जिल्ह्यातल्या सर्वच ठिकाणी मोठ्या ताकदीनं नगरपालिका जिंकू असा विश्वास काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 

फलटण नगरपालिकेत गेली अनेक वर्षे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता आहे. मात्र आता फलटण नगरपालिका आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी काँग्रेस,  भाजप आणि शिवसेनेनं कंबर कसली असून रामराजे निंबाळकरांसमोर  मोठं आव्हान उभं केलंय.  गेल्या ५० वर्षांत फलटण शहराचा विकास झाला नाही असा आरोप काँग्रेसनं केलाय. 

सातारा नगरपालिकेत 20 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 40 आहे.  सातारा नगरपालिकेत उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं मनोमिलन असल्यानं गेल्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र होते. यावेळी  दोघांविरोधात भाजपा आणि शिवसेनेनं दंड थोपटलेत.

सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिका, नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबरला निवडणूक होईल आणि दुस-या दिवशी मतमोजणी...त्यामुळे यंदा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातलं आपलं वर्चस्व कायम ठेवते की भाजप-शिवसेना त्यांना मात देतात हे 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.