घरी सुरू होती लगीन घाई, फोन आला की मुलगा शहीद झाला

उत्तर काश्‍मीरमधील उरी येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात १८ जवान शहीद झाले. यात महाराष्‍ट्राच्‍या चौघांना वीरमरण आले. त्‍यापैकी एक असलेल्‍या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक (२४) यांचे दिवाळीनंतर लग्‍न होणार होते. मात्र, डोक्‍यावर अक्षता पडण्‍यापूर्वीच देशासाठी त्‍यांनी आपले बलिदान दिले.

Updated: Sep 19, 2016, 08:51 PM IST
घरी सुरू होती लगीन घाई, फोन आला की मुलगा शहीद झाला title=

नाशिक : उत्तर काश्‍मीरमधील उरी येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात १८ जवान शहीद झाले. यात महाराष्‍ट्राच्‍या चौघांना वीरमरण आले. त्‍यापैकी एक असलेल्‍या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक (२४) यांचे दिवाळीनंतर लग्‍न होणार होते. मात्र, डोक्‍यावर अक्षता पडण्‍यापूर्वीच देशासाठी त्‍यांनी आपले बलिदान दिले.

नाशिक जिल्ह्यावर शोककळा

रविवारी पहाटे सारा देश साखर झोपेत असताना नापाक इरादे असणा-या दहशतवाद्यांनी उरीमधील लष्करी तळावर हल्ला चढवला. यात नाशिकचे खंडांगळी गावचे संदीप सोमनाथ ठोक शाहिद झाले. संदीपच्या मृत्यूनं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून ग्रामस्थ सुन्न झालेत. तर संदीपच्या कुटुंबीयांनाही अश्रू अनावर झालेत. 

चार वर्षापूर्वीच सैन्यात भरती

17 ऑक्टोंबर 1991 ला जन्मलेले संदीप चार वर्षापुर्वीच सैन्य दलात भरती झाले होते. ते घरचा आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ दोन बहीण असा परिवार आहे. 

वडील करतात टेलरिंग, भाऊ शेतकरी 

शहीद संदीप यांच्‍या कुटुंबीयांची परिस्‍थ‍िती जेमतेमच आहे. त्‍यांचे वडील सोमनाथ ठोक हे टेलर आहेत तर भाऊ शेती करतो. त्‍यांचे कुटुंब खडांगळी गावात शेतातच राहते.

सुरू होणारी लग्‍नाची तयारी

संदीप हे दोन महिन्‍यांपूर्वी सुटीवर घरी आले होते. त्‍यावेळी त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी त्‍यांच्‍या लग्‍नााची बोलणी सुरू केली होती. त्‍या अनुषंगाने दिवाळीनंतर संदीप लग्‍नबंधनात अडकणार होते. मात्र, त्‍यापूर्वी त्‍यांना वीरमरण आले. मात्र लग्नाआधीच त्यांच्या देहाला खांदा देण्याची वेळ कुटुंबीयांवर आलीय. 

सैन्यदलात होते स्वयंपाकी 

संदीप हे 2012 मध्ये सैन्यदलात स्‍वयंपाकी म्‍हणून भरती झाले होते. सुरुवातीला त्‍यांनी बिहार रेजिमेंटमध्ये सेवा दिली. त्यानंतर 22 मराठा बटालियनमध्ये त्‍यांची बदली झाली होती. उरी येथे त्‍यांना काहीच दिवस झाले होते. यापूर्वी ते डेहराडूनच्‍या लष्‍कर तळावर कार्यरत होते.