पुणे : तळेगाव दाभाडे मधील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाला आज धक्कादायक वळण लागले. या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयने न्यायालयाला दिला आहे. त्यामुळे सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचे गुढ आज साडेचार वर्षानंतरही कायम आहे.
दरम्यान तपास बंद करण्यामागे बड्या धेंडाचे हितसंबध गुंतले असल्याचा आरोप सतीश शेट्टी यांचे भाउ संदीप शेट्टी यांनी केलाय.
सतीश शेट्टी हत्या प्रकरणात तपास यंत्रणांची भूमिका सुरूवातीपासूनच संशयास्पद राहिलीय.
शेट्टी यांची हत्या झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी गुंड श्याम दाभाडेसह 5 जणांना या प्रकरणी अटक केली होती. मात्र त्यांच्या विरोधात कुठलेच सबळ पुरावे पोलीस मिळवू शकले नाहीत आणि आरोपींना सोडून देण्याची नामुष्की स्थानिक पोलिसांवर आली.
स्थानिक पोलीस तपासाच्या बाबतीत दिशाभूल करत असल्याची तक्रार सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी हे सुरवातीपासूनच करत आले होते. याच पार्श्वभुमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
सीबीआयनं आयआरबी कंपनीच्या संचालकांसह स्थानिक पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली होती.
एक्सप्रेस हायवेशी संबधित जमिन गैरव्यवहार प्रकरणाचा सतीश शेट्टी यांच्या हत्येशी संबंध असल्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे त्या दिशेने तपास करण्याची परवानगी सीबीआयने गेल्या शुक्रवारीच मिळवली होती. त्याला दोन दिवस उलटत नाही तोच सीबीआयने तपास बंद करण्याबाबतचा अहवाल वडगाव मावळ न्यायालयात दाखल केलाय.
विशिष्ट लोकांच्या दबावाखाली सीबीआयनं निर्णय घेतल्याचा संशय सतीश शेट्टी यांचे भाउ संदीप शेट्टी यांनी व्यक्त केलाय.
सतीश शेट्टी यांनी आयआरबी कंपनी विरोधात जमीन गैरव्यवहाराची तक्रार केली होती. त्यांच्या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवल्यानंतर आयआरबी प्रकरणही सीबीआयकडे वर्ग होणं अपेक्षित होतं. मात्र तसं घडलं नाही.
अखेर आयआरबी प्रकरणाचा सतीश शेट्टी हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा केल्यानंतर सीबीआयला त्या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी मिळाली. मात्र त्याच सीबीआयवर तपास बंद करण्याची नामुष्की आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होतोय.
सतीश शेट्टी हत्या प्रकरणाने संपुर्ण देशात खळबळ उडाली होती. आरटीआय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने समोर आला होता. अशा हत्या रोखणे तर दूरच हत्या झालेल्यांना न्याय मिळणंही अवघड असल्याचं यानिमित्तानं स्पष्ट झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.