गजेंद्र यांना विरोध करणारे 'हिंदूविरोधी' - आरएसएस

'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं असताना त्याला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 18, 2015, 09:32 PM IST
गजेंद्र यांना विरोध करणारे 'हिंदूविरोधी' - आरएसएस title=

पुणे : 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं असताना त्याला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिलाय. गजेंद्र यांना विरोध करणाऱ्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र 'ऑर्गनायझर'मधून समाचार घेण्यात आलाय. गजेंद्र यांना विरोध करणारे हिंदूविरोधी असल्याचा आरोप या मुखपत्रातून करण्यात आलाय. या विरोधामागे षडयंत्र असल्याचा आरोपही यातून करण्यात आलाय... तसंच गजेंद्र यांना विरोध करणाऱ्या बॉलीवुडच्या मंडळींवरही ऑर्गनायझरमधून हल्लाबोल करण्यात आलाय.

'एफटीआयआय'मध्ये विद्यार्थ्यांच्या निशाण्यावर असलेल्या गजेंद्र चौहान यांची आरएसएसने बाजू घेतली आहे. 'स्वत:ला हितचिंतक समजणारे संस्था आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत नाहीत. त्यांचा हिंदूंविरूद्ध प्रचार करण्याचा उद्देश आहे. यांच्यातील काही लोकांवर आधीपासूनच हिंदूविरोधी असल्याचं लेबल लागलं आहे. ज्यांत आघाडीवर आहे पीके चित्रपट निर्माता राजकुमार हिराणी, त्याच्यावर हिंदूंची नकारात्मक बाजू दाखवण्याचा आरोप आहे. हिराणी आधी पुण्यातील एफटीआयआयचे सदस्य होते... तसंच या यादीत घोषित माओवादी डायरेक्टर मृणाल सेन, हिंदूविरोधी गिरीश कर्नाड आणि भाजपविरूद्ध विचार करणाऱ्या श्याम बेनेगल यांचा समावेश आहे' असं संघाचं म्हणणं आहे.

'ऑर्गनायझर'नं केलेल्या विधानाशी पूर्णपणे सहमत असल्याचे संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी म्हटलंय. गजेंद्र चव्हाण यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला डाव्या संघटनांचा पाठिंबा आहे आणि या सर्व संघटनांचे धोरण नेहमीच हिंदूविरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.