नागपूर : राष्ट्रीय स्वयं सेवक संघ मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. केंद्रात सत्ता असल्याने आरएसएसच्या बदलाकडे सर्वांची नजर लागून आहे. आरएसएसमधील सर्वात मोठा बदल हा खाकी हाफ चड्डी लांब आणि कापडाचा रंग बदलणे हा असण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत.
यापूर्वी देखील खाकी हाफ चड्डी लांब करण्यावर विचार झाला होता, पण यावर सहमती होऊ शकली नव्हती, मात्र यावेळी यावर सहमती होण्याची शक्यता वाढली आहे.
हाफ पॅन्ट बदलाची शक्यता वाढली
संघाच्या हाफ पॅन्टमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर, लोकांनी अनेक अंदाज बांधण्यास सुरूवात केली आहे. युवकांना आकर्षित करण्यासाठी हाफ पॅन्ट हटवली जाणार, त्या जागी लांब पॅन्ट गणवेश म्हणून येणार असं म्हटलं जात असलं, तरी असं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात येत आहे.
संघ स्थापनेपासून आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत, यात खाकी शर्ट ऐवजी पांढरा शर्ट आला, गम आणि चामड्याच्या बुटाच्या जागी कापडी बुट आले. चामड्याचा पट्टा सोडून सुती बेल्ट आला. सुती बेल्ट हा जैन मुनी तरूण सागरजी यांच्या सूचनेवरून आला असल्याची त्यावेळी चर्चा होती.
संघाने काळानुसार अनेक बदल केले आहेत. संघ आधुनिक होतोय का असं विचारल्यावर संघाचे पदाधिकारी मात्र संघ आधीपासूनच आधुनिक असल्याचं सांगतात.
या बैठकीत होणार अंतिम निर्णय
नागपूरच्या मुख्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या नागौरमध्ये आरएएसच्या सर्वाच्च समितीची प्रतिनिधी सभा आहे, ही सभा ११ ते १३ मार्च दरम्यान आहे, त्यावेळी संघाच्या चड्डीवर निर्णय होऊ शकतो.
यासाठी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ज्येष्ठ विचारवंतांची एक समिती बनवली आहे, त्यांची ड्रेस डिझायनर्सशी चर्चा सुरू असल्याचंही सांगण्यात येतं. गणवेश बदलाची ही तयारी मागील वर्षापासून सुरू आहे, ती आता अंतिम टप्प्यात आली असल्याचंही सांगण्यात येत आहे.
चड्डीचा रंग बदलण्यावर निर्णय होऊ शकतो
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफ पॅन्टचा अथवा लांब पॅन्ट लागू केल्यास तिचा रंग हा - रेमंड ब्लू, ब्राऊन किंवा ग्रे असणार आहे, यावरून हे स्पष्ट आहे की, खाकी रंगाच्या पॅन्टला संघ निरोप देणार आहे. दसऱ्यापर्यंत हा नवा पोशाख दिसेल अशी शक्यता आहे.
नवीन ड्रेस निवडताना काही गोष्टींची काळजी घेतली जात असल्याचंही सांगण्यात येत आहे. यात मार्शल आर्टस, व्यायाम आणि ड्रिल करताना किती सोयीस्कर नवा पोषाख असेल याची काळजी घेतली जाणार आहे.
वेळोवेळी झाले गणवेशात असे बदल
संघाच्या गणवेशात पहिल्यांदा बदल झाला होता, तो १९३९ साली, तेव्हा शर्टाचा रंग बदलला होता, खाकी शर्ट सफेद झाला होता, यानंतर दुसरा बदल झाला १९७३ साली तेव्हा मिलिट्री शूज ऐवजी साधे शूज आले. २०१० मध्ये बेल्ट बदलला, तेव्हाही हाफ चड्डी बदलून फूल पॅन्टवर चर्चा झाली, मात्र एकमत झालं नाही.