रत्नागिरी : जिल्हा रूग्णालयात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी येथे केली.
दीपक सावंत यांनी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाला भेट दिली, त्यावेळी ही माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं सरकारने ठरवले आहे. त्याद़ृष्टीने कामही सुरू झाल्याचे ते म्हणाले.
ही सर्व वैद्यकीय महाविद्यालय पीपीपी तत्वावर असणार आहेत. पब्लिक प्राव्हेट पार्टनरशिपअंतर्गत सुरू झालेल्या या महाविद्यालयांमुळे डॉक्टरांची संख्याही वाढून सर्व रुग्णांना चांगली सेवा मिळेल, असे ते म्हणालेत.
रत्नागिरीमध्ये सध्या २०० बेडची सुविधा आहे. एखादे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी कमीत कमीत ३०० बेडचे हॉस्पिटल असणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रत्नागिरीत १०० बेड्स वाढवून मेडिकल कॉलेजची मान्यता मिळवली जाणार आहे, अशी माहिती दीपक सावंत यांनी दिली.