शुभांगी पालवे, नाशिक : राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या इतर पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत आहेत... यात भाषणांत अनेकदा कामाचा उल्लेख कमीच असतो. पण, प्रचाराची खालची पातळी मात्र सहजगत्या गाठली जाते. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आपलं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकचा गेल्या पाच वर्षात केलेला विकास प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पडद्यावर लोकांच्या समोर मांडत आहेत. राज ठाकरेंचा हा अंदाज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरलाय.
'आम्ही केलेली कामे आम्ही दाखवली, बाकीचे पक्ष का नाही दाखवत' असं नुकतंच राज ठाकरे यांनी मुंबईच्या एका सभेत बोलताना केलं होतं. त्यानंतर, आज त्यांनी नाशिकमध्ये प्रचारसभेत 'मॅक'वर त्यांनी फोटोंच्या माध्यमातून मनसेनं नाशिकमध्ये केलेल्या कामं त्यांनी जनतेसमोर मांडली. उल्लेखनीय म्हणजे, राज ठाकरे यांनी यात दाखवलेल्या कामांमध्ये निम्म्याहून अधिक कामं ही सीएसआर फंडातून पूर्ण करण्यात आली आहेत. नाशिकमध्ये उभारलेलं गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे स्मारक, चिल्ड्रन एज्युकेशन पार्क ही सर्व कामं मनसेनं 'सीएसआर' अर्थातच अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' फंडातून पूर्ण केल्याचीही स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
- मुकेश अंबांनीना गोदा पार्कची संकल्पना सांगितली आणि त्यांनी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला
- रतन टाटांना विनंती केली आणि त्यांनी टाटा ट्रस्टच्या सीएसआरमधून बोटॅनिकल गार्डनच्या नवनिर्माणाला निधी उपलब्ध करून दिला
- जीव्हीके समूहाला मी विनंती केली आणि त्यांनी तात्काळ मा.बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्र संग्रहालयाला सीएसआरमधून निधी दिला
- नाशिकमध्ये ५ एकरमध्ये महिंद्रा समूहाच्या सीएसआर निधीतून चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क उभारलं
असं राज ठाकरेंनी आपल्या नाशिकच्या सभेत म्हटलंय.
गेली पाच वर्षं नाशिक महापालिका मनसेकडे आहे आणि पाच वर्षांत आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोठ्या अभिमानानं सांगताना दिसतात. उद्योगपतींनी सीएसआर फंडातून नाशिकमध्ये कामं केली पण इतर ठिकाणी ही कामं झाली नाहीत... कारण सत्ताधाऱ्यांना सीएसआरच्या कामातून पैसे खाता येत नाही, असंही त्यांनी आपल्या एका सभेत म्हटलं होतं.