www.24taas.com, मुंबई
दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या राज्याला कालपासून अवकाळी पावसानं चांगलाच दणका दिला. वीजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.
वीज पडून राज्यात सहा जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये बीड जिल्ह्यात दोघांचा, कोल्हापूर जिल्ह्यात दोघांचा , परभणीमध्ये एकाचा तर सोलापूर जिल्ह्यातही एका महिलेचा मृत्यू तर एक जण जखमी झालाय. विदर्भातही यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर काही ठिकाणई घरांची छतं उडालं. नागपुरमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडलाय. त्यामुळे संत्री आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. येत्या २४ तास वातावरण ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.
यवतमाळमध्येही गेल्या दोन दिवसांपासून वादळी पाऊस कोसळतोय. गारपीटसह बरसणाऱ्या या पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसलाय. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक वाय गेलंय. जोरदार वादळामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले असून मोठी वृक्षदेखील उन्मळून पडलीत. गहू, चना, कापूस संत्री, मोसंबी या पिकांना पावसाने तडाखा दिलाय. यवतमाळला गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात अजूनही ढगाळ वातावरण असल्यानं बळीराजा चांगलाच हवालदिल झालाय.