मे महिन्यातही राज्यात पाऊस कोसळलाsss

राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय.  पिंपरी चिंचवड, सातारा, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. कल्याणमध्येही विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. 

Updated: May 5, 2015, 07:44 PM IST
मे महिन्यातही राज्यात पाऊस कोसळलाsss title=

मुंबई : राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय.  पिंपरी चिंचवड, सातारा, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. कल्याणमध्येही विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. 

अचानकपणे आलेल्या या पावसामुळ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेली दोन आठवडे नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. पावसाच्या शि़डकाव्यामुळं  नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. तर अहमदनगर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पावसानं वादळी वा-यासह दमदार हजेरी लावली. 

नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून 40 अंशापेक्षा जास्त पार चढला होता. मात्र आजच्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला. उद्या विदर्भात वादळी वा-यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः दक्षिण रायगडात या अवकाळीचा चांगलाच फटका बसला. महाड , पोलादपूर , माणगाव , म्हसळा , श्रीवर्धन , रोहा तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. महाड शहरातील काकरतळे परिसरात  घरांवर वीज कोसळली. यात जिवीतहानी झाली नसली तरी चार घरांचे नुकसान झाले. महसूल यंत्रणेने पडझड झालेल्या घरांची पाहणी केली असून पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. 

सध्या कोकणात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने लग्न मंडपांमध्ये एकच धावपळ उडाली. वादळी वार्‍याने मंडपांचे नुकसान झाले. अगोदर झालेल्या पावसातून वाचलेल्या आंबा काजू पिकांचेही या पावसामुळे नुकसान झाले आहे. नुकसान झाले असले तरी प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.