लातूरला होणार रेल्वेने पाणीपुरवठा, सुरेश प्रभूंचा निर्णय

नवी दिल्ली : पाण्याचं दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केलंय. 

Updated: Mar 25, 2016, 04:14 PM IST
लातूरला होणार रेल्वेने पाणीपुरवठा, सुरेश प्रभूंचा निर्णय  title=

नवी दिल्ली : पाण्याचं दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केलंय. 

राज्य सरकारनं याबाबत मागणी केली होती आणि याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचंही प्रभू यांनी सांगितलंय. याचा तपशील रेल्वे मंत्रालय लवकरच जाहीर करणार असून त्यासाठी रेल्वे तयारी करत असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.

मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना लातूरमधील स्थिती सर्वात वाईट आहे. लातूरमध्ये सात दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे भीषण दुष्काळाला तोंड देणाऱ्या लातूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावीच लागेल. 

नवी मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातही रेल्वेला आदेश दिले असल्यांचं सुरेश प्रभू यांनी सांगितलंय. देशात जिथे जिथे पाण्याचा प्रश्न निर्माण होईल त्या त्या ठिकाणी रेल्वे कशा पद्धतीने पाणीपुरवठा करेल याचाही विचार सुरू असल्याचं प्रभू यांनी सांगितलंय.