पुणे : बातमी पुण्यामधल्या गोलमालची. पुण्यात नो पार्किंगमध्ये गाडी लावलीत की हमखास उचलली जाते. पण अशा किती गाड्या उचलल्या गेल्या, याचा हिशोब मांडला तर क्षणभर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
पुण्यात सध्या वाहतूक पोलिसांच्या एका गौडबंगालाची जोरदार चर्चा सुरू आहे. नो-पार्किंग मध्ये लावलेली वाहनं उचलणारा वाहतूक विभागाचा टेंपो पुणेकरांच्या चांगलाच परिचयाचा झालाय. मात्र जर वाहतूक पोलीस रोज मोठ्या प्रमाणात वाहने उचलत असतील तरी वाहतूक पोलिसांचा एक टेम्पो दिवसातून फक्त १६ च दुचाकी उचलत असल्याचं समोर आलंय.
या टेंपोंनं गेल्या वर्षभरात नो-पार्किंगमधली ७३ हजार सहाशे दुचाकी वाहने उचललीयत. यावरून हिशेब काढला तर एक टेम्पो दिवसाला फक्त सोळा दुचाकी उचलतो. नो पार्किंगची कारवाई ही वाहतूक पोलीस ठेकेदारांचे टेम्पो घेऊन करत असतात. त्यामुळे दिवसाला सोळा हा आकडा फारच कमी आहे. तो जर खरा मानला तर टेम्पोचालक नुकसान सहन करत हा व्यवसाय करतात की काय, हाही प्रश्न येतोच.
एक दुचाकी उचलली की त्या कारवाईतले पन्नास रुपये ठेकेदाराला मिळतात. जर सोळा दुचाकींचा हिशेब केला तर एका टेम्पोला फक्त आठशे रुपयांचं उत्पन्न मिळतं. मग या आठशे रुपयात गाडीला लागणारं इंधन, काम करणारे कर्मचारी आणि गाडीचा चालकाचा खर्च कसा भागवणार ?
या प्रकरणी चौकशी करून भ्रष्टाचार उघड करावा, आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होतेय. पुणेकर इमानेइतबारे नो-पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांसाठी दंड भरत असले तरी हा पैसा सरकारी खात्यात जमा होत नाही. हेच यावरून दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे वाहतूक पोलीस याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.