पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद चिघळला

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळला आहे. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार भाजप वगळता अन्य पक्षीय नेत्यांनी केलाय.

Updated: Oct 20, 2016, 08:24 PM IST
पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद चिघळला title=

पुणे : पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळला आहे. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार भाजप वगळता अन्य पक्षीय नेत्यांनी केलाय.

एकवेळ पुणे मेट्रो झाली नाही तरी चालेल, पण नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला काम देता कामा नये. भाजपचा अपवाद वगळता सर्वच पक्षांच्या नगरसेवकांची हीच भावना आहे. पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव पुणे महापालिकेत बुधवारी संमत करण्यात आला. 

एवढंच नाही तर सर्वपक्षीय नेत्यांनी या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. विशेष म्हणजे शिवसेना आणि आरपीआय हे भाजपचे मित्र पक्ष देखील या मुद्द्यावरून विरोधात उतरलेत. पुणे मेट्रोच्या कितीतरीनंतर नागपूर मेट्रोची प्रक्रिया सुरु झाली. पण भाजप सरकार आल्यावर नागपूर मेट्रो सुसाट सुटली.

पुणे मेट्रो मंजुऱ्यांच्या फेऱ्यात अडकली असताना नागपूर मेट्रोचं भूमिपूजन देखील झालं. ही सल मनात असतानाच, पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन करेल या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जखमेवर मीठ चोळलं गेले. पण आता भाजपची बाजू सावरण्याचा प्रयत्न भाजप नगरसेवक करत आहेत.

नागपूर, अहमदाबाद किंवा बंगळुरु सर्व शहरांत मेट्रोची कामं करण्यासाठी त्या शहरांच्या नावानं कंपन्या स्थापन करण्यात आल्या. त्याला पुण्याचाच अपवाद का असा प्रश्न विचारला जातोय.

पुणे मेट्रो कामासाठी महापालिका दहा टक्के रक्कम देणाराय. शिवाय 50 टक्के रक्कम कर्जातून उभारली जाणार आहे. म्हणजे मेट्रोतून प्रवास करणारे पुणेकर कर्ज फेडणार. मेट्रोसाठी साठ टक्के रक्कम पुणेकर देणार असताना, नागपूर मेट्रोला काम कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

आता हा अस्मितेचा प्रश्न बनला असून, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.