पुणे : पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवक त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतील इच्छुकांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसह प्रभागांचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. त्यानुसार शहरातील प्रभागांची 2011 च्या जनगणनेच्या आधारावर पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या प्रभागात झालेल्या बदलांवर अनेकांचं भवितव्य ठरणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडतही उद्या निघणार आहे. त्यामुळे कुठला प्रभाग कुणासाठी आरक्षित असेल याचा निर्णय लागणार आहे. त्यामुळे अनेक विद्यमान तसंच इच्छुकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान यावेळी पुण्यातील नगरसेवकांची संख्या १५२ वरून १६२ वर गेलीय. त्यामुळे सभागृहातील सभासद संख्या दहाने वाढणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये ही आरक्षण सोडत निघणार आहे. त्याच ठिकाणी प्रभाग रचनेचे नकाशे देखील लावण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्यापासूनच पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थानं उडणार आहे.