कैलास पुरी, झी मीडिया, पुणे: कॅन्सर या आजाराचं नाव ऐकलं तरी अनेकांना धडकी भरते. पण पुण्याच्या अभिनव शाळेत शिकणाऱ्या मीहिर जोशीनं कॅन्सरशी दोन हात करत दहावीची परीक्षा दिली आणि चक्क ९१ टक्के मार्क मिळवले..
जोशी कुटुंबियांच्या आनंदाला पारावार राहिला नाहीये.. त्याचं कारण त्यांचा हुशार मुलगा मिहीर... मिहीरला दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के मिळाले आहेत. पण त्याचं हे यश अजून विशेष आहे. कारण मिहीरला दहावीचं वर्ष सुरू झाल्यावर कॅन्सरनं गाठलं.. जुलैमध्येच त्याच्या या आजाराचं निदान झालं. हातात वेळ कमी होता. केमोथेरपी तातडीनं सुरू करणं भाग होतं. पण मिहीर डगमगला नाही. त्यानं त्याच्या निर्धारानं घरच्यांना बळ दिलं आणि तो परीक्षेला बसला.
कॅन्सरचं गांभीर्य तेव्हा मला कळलं नाही आताही कळत नाही असं मिहीर सांगतो. केमोथेरपी सुरू असतानाही ह़ॉस्पिटलमध्ये तो जमेल तसा अभ्यास करायचा.
मिहीर हा चौकस विद्यार्थी आहे. कॅन्सर झालाय म्हणजे नेमकं काय झालंय. प्लेटलेट्स कमी झाल्यात म्हणजे काय झालंय, त्यांची आवश्यकता काय अशी माहितीही त्यानं उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून मिळवली. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर त्याचा आदर्श आहेत म्हणूनच भविष्यात त्यांच्यासारखाच आँकॉलॉजिस्ट व्हावं हे त्याचं आता लक्ष्य आहे. जिद्दी मिहीरसमोर कॅन्सर नक्की हरेल आणि मिहीरचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होईल यात शंकाच नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.