अखिलेश हळवे, नागपूर : नागपूरच्या एका स्वत:ला भाजप नेता म्हणवणाऱ्या गावगुंडानं एका प्राध्यापकाच्या गाडीची आणि बाइकची तोडफोड केल्याच्या घटनेला जेम-तेम आठवडा लोटला असतानाच, आता त्याच प्राध्यापकाची आणखी एक गाडी जाळण्यात आलीय. प्रेरणानगर भागात ही घटना घडलीय.
गेल्याच आठवड़्यात गाडीचा चुराडा केल्यानंतर 'पोलिसांत तक्रार केली तर सोडणार नाही' अशी धमकी सुमित ठाकूरनं प्राध्यापक म्हस्के यांना दिली होती. उल्लेखनीय म्हणजे यानंतर म्हस्के यांना पोलीस संरक्षणही देण्यात आलं होतं. दोन पोलीस शिपाई घरात असताना बाहेर पार्क केलेली कार जाळून सुमित ठाकूरने पोलिसांच्या नाकावर टिच्चून आपली धमकी खरी करून दाखवली.
दरम्यान, या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी सुमित ठाकूर, त्याचा भाऊ अमित आणि काही साठेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमित ठाकूरच्या वडिलांनी याप्रकरणी अटक केली असून त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित ठाकूरला राजकीय संरक्षण मिळाल्याचा आरोप खुद्द म्हस्के यांनी केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचंही दिसतंय. कारण, म्हस्के यांची तक्रार दाखल करून घेण्यासाठीही पोलिसांनी टाळाटाळ केली होती. आता तक्रार दाखल झाल्यावर ४८ तास उलटले तरीही सुमित ठाकूरला अटक झालेली नाही.
या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुंडाराज आहे का? असा प्रश्न पडला असेल तर तसा समज अगदीच चूक नाही, असं आता ठसठशीतपणे दिसून येतंय.
कोण आहे हा सुमित ठाकूर
सुमित ठाकूर हा गावगुंड भारतीय जनता युवा मोर्चाच्या पश्चिम नागपूर उपाध्यक्ष आहे. गुंड प्रवृत्तीच्या सुमित ठाकूरवर मकोका दाखल असून सध्या तो जमानावर बाहेर आहे.
सुमित ठाकूर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार केला तर त्याच्यावर नागपुरातील विविध पोलिस ठाण्यात एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. खून, अपहरण, खंडणी, अपहरण, दरोडा सारख्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.