नाशिक : जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिक्षकांचं नाव घेतलं आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आठवडाभरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवनप्रवास संपविल्याने पोलीस दलाला हादरा बसलाय.
खाकी पुन्हा एकदा वादात सापडलीय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अशोक सादरे या पोलिसानं नाशिकमध्ये आत्महत्या केलीय. सुसाईड नोटमध्ये पोलीस दलातील भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्तींचा उल्लेख करुन जगासमोर आणलाय.
जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी नाशिकमधल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलीय. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक जालिंदर सुपेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सादरे यांच्या सुसाईड नोटवरुन समोर आलंय.
जळगावात वरिष्ठ अधिकारी केवळ पैसे कमावण्यासाठी पदावर बसले आहेत. दिवाळी सणाला पोलीस अधिका-यांकडून सोने तसंच पैशांची मागणी केली जाते. जालिंदर सुपेकर आणि प्रभाकर रायते यांनी कलेक्शनचे पैसे देण्यासाठी ७ महिने अतोनात मानसिक छळ केला. सागर चौधरी नामक वाळू वाहतूकदाराला हाताशी धरुन खुलासा घेण्यापूर्वीच गुन्हा दाखल करुन निलंबित करण्यात आलं. प्रामाणिक अधिका-यांना जळगाव जिल्ह्यात नोकरी करणं अवघड झालंय.
भ्रष्टाचाराच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊनही कारवाई झाली नाही. अशा अपप्रवृत्तींच्या एकजुटीसमोर लढताना एकाकी पडलो असल्यानं जीवन संपवत आहे. नव्याने नियुक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी लक्ष घालून चौकशी करुन असे प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, अशा प्रकारची सुसाईड नोट पोलिसांना सापडलीय.. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान, दुसरीकडे पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी सर्व आरोप फेटाळले असून चौकशीला तयार असल्याचं म्हटलंय. सादरे यांच्या आत्महत्येमुळं खाकी पुन्हा एकदा वादात सापडली असून पोलीस दलातला भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय.. या सगळ्या प्रकारावर पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित काय कारवाई करतात याकडं नजरा लागल्यात. दरम्यान या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी आणि सखोल चौकशीची मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात येतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.