पुणे : जगातली सर्वात जलद कॅशियर असं कॅप्शन असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बॅकेमध्ये काम करणारी एक महिला अत्यंत धिम्या गतीनं काम करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. बलराजू सोमीसेटी यांनी हा व्हिडिओ 24 ऑक्टोबरला अपलोड केल्यानंतर हा व्हिडिओ तेरा लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आणि दीड लाखांपेक्षा जास्त जणांनी तो शेअर केला आहे.
या व्हिडिओबाबतची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या महिला या प्रेमलता शिंदे आहेत. प्रेमलता शिंदे या पुण्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये सध्या काम करत आहेत.
प्रेमलता शिंदे यांना एकदा पॅरेलिसीसचा तर दोनवेळा हार्ट अॅटेक आला आहे. हा व्हिडिओ शूट करण्यात आला तेव्हा नुकत्याच प्रेमलता या कामावर रुजू झाल्या होत्या. फेब्रुवारी 2017मध्ये प्रेमलता शिंदे या निवृत्त होणार आहेत. प्रेमलता यांच्या उरलेल्या सुट्ट्या पाहिल्या तर त्या आता बँकेत कामाला आल्या नाहीत तरी चालेल पण त्यांना स्वाभिमानानं निवृत्त व्हायचं आहे, म्हणून त्या कामाला येत आहेत, अशी प्रतिक्रिया बँकेच्या प्रशासनानं दिली आहे.
प्रेमलतांमुळे बँकेच्या ग्राहकांचा खोळंबा होत असल्याचा आरोपही या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता. बँकेनं मात्र हा आरोपही कसा खोटा आहे हे सांगितलं आहे. प्रेमलता यांच्यासाठी बँकेनं वेगळं काऊंटर सुरु करुन दिलं आहे. यामुळे त्यांना स्वत:च्या वेगानं काम करता येईल.
प्रेमलता यांचा मुलगा हा परदेशात त्याच्या कुटुंबाबरोबर राहतो. प्रेमलता यांनी उपचारासाठीही मुलाकडून पैसे न घेता स्वत:च्या कमाईच्या पैशांनी आजारपणावर उपचार केले आहेत.
अशा प्रकारचे व्हिडिओ शूट करताना आणि शेअर करून प्रेमलता यांना सोशल नेटवर्किंगवर हिणवण्यात आलं आहे. पण हे करताना प्रत्येकानं भान बाळगणं आणि सत्य जाणून घेणं तितकच गरजेचं आहे.
हा आहे व्हायरल झालेला तो व्हिडिओ