भिवंडी : येथील कोलीवली गावात धक्कादायक घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. पूर्ववैमनस्यातून कारनं दीड वर्षांच्या मुलाला चिरडले. मात्र, हा अपघात नव्हता तर पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केल्याचे पुढे आलेय.
देवानंद पाटील आणि विश्वनाथ पाटील यांच्यात सांडपाण्यावरुन १५ वर्षांपासून वाद होता. त्याचा राग मनात धरत विश्वनाथ पाटील याने देवानंद यांचा मुलगा देवांग याला कारने चिडले. यात कोवळ्या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, तो कारसहित फरार आहे.
घराबाहेर खेळणाऱ्या देवांगला विश्वनाथ पाटील याने आपल्या कारने चिरडले आणि तिथून त्याने पळ काढला. घटनास्थळी देवांगची काकूही उभी होती. चिमुकला देवांग गाडी खाली आल्याचे बघताच तिने आरडोओरड करुन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही चालक विश्वनाथ पाटीलने गाडी चालूच ठेवली.
आधी अपघाती मृत्यूची नोंद भिवंडी तालुका पोलिसांनी केली होती. आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.