पुणे : तरूणीला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्याला आरोपीला अवघ्या ४८ तासात निकाल देऊन दोन वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावल्याचा ऐतिहासिक आणि जलद निकाल आज खेड राजगुरूनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिला.
अतुल गणेश पाटील (चाकण) असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर अवघ्या ४८ तासांत आरोपीला शिक्षा होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असून, हा सर्वात जलद निकाल असल्याचे बोलले जाते.
आरोपीला दोन वर्षांच्या कठोर कारावासाची आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अतुल गणेश पाटील याने तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठवला होता. या प्रकरणी आरोपीविरुद्ध चाकण पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला तातडीने अटक करून न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले होते.
खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांच्यासमोर झाली. त्यांनी आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षांची कठोर तुरुंगवासाची शिक्षा आणि ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एका महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
विशेष म्हणजे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास २४ तासांत पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत या खटल्याचा निकाल लागला आहे. राज्यातील हा सर्वात जलद निकाल असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे वकील राजीव एम. तडवी यांनी काम पाहिले. तर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी तपास केला असून, हवालदार संजय मोघे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
राजगुरूनगर उपजिल्हा न्यायालयाने हा निकाल दिल्यामुळे या निकालाचे सर्वत्र कैतुक होत आहे