आता, 'बॅंड बाजा'शिवाय बारात!

लग्नसमारंभातील बँण्ड बाजा बारातीला आता आवर घालावा लागणार आहे.  बँड बाजा तसेच डीजे सिस्टीमचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायालयानं दिले आहेत.  

Updated: Apr 11, 2015, 10:50 PM IST
आता, 'बॅंड बाजा'शिवाय बारात! title=

पुणे : लग्नसमारंभातील बँण्ड बाजा बारातीला आता आवर घालावा लागणार आहे.  बँड बाजा तसेच डीजे सिस्टीमचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायालयानं दिले आहेत.  

लग्नसमारंभातील हा गाजावाजा यापुढे अंगलट येणार आहे. लग्न समारंभात बॅण्ड, डीजे तसेच प्रकाशझोतांचा अतिरेकी वापर करण्याची क्रेझ अलीकडच्या काळात वाढली आहे. लग्न सोहळ्याचा आनंद साधेपणाने व्यक्त करण्याऐवजी त्याच्या प्रदर्शनावर लाखोंची उधळण करण्यात मोठेपणा मानला जातो. अर्थात हा विषय वैयक्तिक असला तरी त्याचा नाहक त्रास इतरांना होतो, हे नाकारता येणार नाही. 

पुण्याच्या म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डी पी रोड परिसरात राहणारे नागरिक या समस्येनं त्रस्त आहेत. या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊनही काही उपयोग झाला नाही. परिणामी त्यांना राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाकडे दाद मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

या पार्श्वभूमीवर, लग्नसमारंभातील अशा ब्यांड बाजा, वरातीचा धार्मिक विधी तसेच परंपरेशी काहीही संबंध नसल्याचं मत हरित न्यायाधिकरणाने नोंदवलं आहे. या सगळ्याचा विचार करून सामाजिक उपद्रव तसेच प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर पोलीस तसेच संबंधित विभागांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
मंगल कार्यालय चालक तसेच बॅंड व्यावसायिकांनी या निर्णयाचे अंशत: स्वागत केलय.  या समस्येला डी जे संस्कृती कारणीभूत असल्याचं सांगत  बँड बाजा बंदीला त्यांनी विरोध केलाय.  

केवळ पुणेच नाही तर राज्यभरातील इतर शहरांममध्ये हीच परिस्थिती आहे. ध्वनी तसेच वायू प्रदूषणातून सामान्य जनतेला त्रास होण्या बरोबरच पर्यावरणाला मोठी हानी पोचतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.