नोटबंदीचे असे साइड इफेक्ट तुम्ही वाचले नसतील....

नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत. 

Updated: Nov 17, 2016, 08:25 PM IST
नोटबंदीचे असे साइड इफेक्ट तुम्ही वाचले नसतील.... title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यामधल्या बाळा नगरचे हे कापूस शेतकरी आसीफभाई. यांनी काही दिवसांपूर्वी कापूस विकला त्याचे त्यांना 40 हजार रुपये, एक हजाराच्या नोटांच्या रुपात मिळाले. त्यानंतर नोटबंदीचा निर्णय आला आणि त्यांचा कष्टाचा पैसा पडून राहिला. ती रक्कम बँकेतून बदलून घ्यावे तर ही भलीमोठी गर्दी पाहायला मिळते. त्यातच आता गावातली सहकारी बँकही पैसे घेत नसल्यानं, आसिफभाई आणि त्यांच्यासारख्याच इतरांची मोठी पंचाईत झाली आहे. 

परिसरातल्या 18 गावांसाठी एकच बँक असलेल्या या गावातल्या ग्रामिण बँकेतून 2 हजारांची एक नोट मिळत आहे. मात्र त्या नोटेचे सुट्टे देणारंच गावात कोणी नाही. 

पैशांच्या चणचणीपायी गावातली 70 टक्के दुकानं गेली तीन दिवस बंदच आहेत. कारण लोकांकडे पैसा नाही आणि दुकानात धंदा नाही. 

यामुळे हातावर पोट असणारे गावातले अनेक छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. 

उज्ज्वल भविष्यासाठी नोटाबंदीचे असेही भयंकर चटके ग्रामिण भागात पाहायला मिळत आहेत. अशातच शेतक-यांचं खरीपाचं पिक आलं असताना, व्यापारी माल घ्यायलाही तयार नाहीत. त्यामुळे रुळांवरून उतरलेली चलनाची ही गाडी तातडीनं रुळावर आली नाही, तर अडचणी अधिक वाढणार यात शंका नाही.