पुणे : सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी पुणे महापालिकेचं शिक्षण मंडळ काम करतं. मात्र शिक्षण मंडळाच्या सुमारे 35 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याचं समोर आलंय. यावर्षी तरी या शाळांना मुख्याध्यापकच मिळणार नसल्याचं चिन्हं आहे. त्यामुळए मुख्याध्यापक नाही भरल्यास आंदोलनाचा इशारा नगरसेवकांनी दिलाय.
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळात घोटाळ्याचं सत्र सुरू असतं. मात्र यावेळी घोटाळा नाही तर महापालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकच गायब झालेत. तेही एक दोन नाही तर तब्बल 35 शाळा मुख्याध्यापका विना चालवल्या जात असल्याचं समोर आलाय. पुणे महापालिका आणि शिक्षण मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पण याच पक्षाचे नगरसेवक असलेल्या दिलीप बराटे यांच्या वॉर्डातील तीन शाळेत मुख्याध्यापक नसल्याचं त्यांनी समोर आणून दिले. त्यामुळे मुख्याध्यापक भरती नाही केल्यास आंदोलन करण्याच्या तयारीत बराटे आहेत.
शिक्षण मंडळाच्या अनेक शाळांत मुख्याध्यापक नाहीत. हे खुद्द शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष कबूल करतायेत. शिक्षण मंडळाच्या 200 च्या आत पट असलेल्या शाळेत प्रभारी मुख्याध्यापाक आहेत. त्यामुळे अशा शाळेत आता तरी मुख्याध्यापक देता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
मुख्याध्यापक नसल्याचा फटका जसा विद्यार्थ्यांना बसतोय, तसाच तो इतर शिक्षकांना देखील बसतोय. शिक्षण मंडळाचे बजेट साडे तीनशे कोटींच्या घरात आहे. एकीकडे कोट्यावधी रुपये शिक्षणावर महापालिका खर्च करत असताना जर शिक्षकच नसतील तर मूल करणार काय असा प्रश्न विचारला जातोय.